VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
धर्मरावबाबांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध कव्वालांचा शानदार मुकाबला; अभिनेता चेतन हंसराज यांचीही उपस्थिती
गडचिरोली /अहेरी, 17 ऑक्टोबर 2026::-विजयादशमीचा उत्साह आणि आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहेरीत २० ऑक्टोबर रोजी कव्वालीचा शानदार मुकाबला रंगणार आहे. धर्मरावबाबा आत्राम फॅन्स क्लबच्या वतीने बाजारवाडी येथील भव्य मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कव्वाल आपल्या दमदार सादरीकरणातून रसिकांची मने जिंकणार आहेत. त्यामुळे अहेरीकरांसह परिसरातील कव्वालीप्रेमींना सुरांची जुगलबंदी अनुभवण्याची अनोखी पर्वणी मिळणार आहे.
दरवर्षी विजयादशमीच्या शुभपर्वावर धर्मरावबाबा आत्राम फॅन्स क्लबच्या वतीने कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा विजयादशमी आणि आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा वाढदिवस एकाच दिवशी येत असल्याने या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दुहेरी आनंदाच्या पार्श्वभूमीवर अहेरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोंगरी का सुलतान, अजीज नाझा आणि गीता सिंग चिस्ती यांची जुगलबंदी :-
या शानदार कव्वाली मुकाबल्यासाठी सुप्रसिद्ध कव्वाल डोंगरी का सुलतान, अजीज नाझा आणि नामांकित कव्वाला गीता सिंग चिस्ती यांना आमंत्रित करण्यात आले आहे. २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता बाजारवाडी येथील भव्य मैदानावर कव्वालीचा हा रंगतदार कार्यक्रम सुरू होणार आहे.
आपल्या दमदार आवाजाने, सूफी संगीताच्या सुरांनी आणि प्रभावी सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या कलाकारांमधील मुकाबला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन धर्मरावबाबा आत्राम फॅन्स क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
अभिनेता चेतन हंसराज यांचीही राजवाड्यात उपस्थिती :-
आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध अभिनेते चेतन हंसराज हेही २० ऑक्टोबर रोजी अहेरी येथे येणार आहेत. ‘कुक डू कू’ चित्रपट तसेच ‘महाभारत’ मालिकेतील भूमिकेमुळे परिचित असलेले चेतन हंसराज सकाळी ११ वाजता राजवाड्यात आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात येणार आहे.
एकीकडे वाढदिवसाचा उत्साह, तर दुसरीकडे प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत रंगणारा कव्वालीचा शानदार मुकाबला, यामुळे २० ऑक्टोबर हा दिवस अहेरीकरांसाठी खास ठरणार आहे. या कार्यक्रमाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
