Tuesday, October 27, 2026
HomeGadchiroliदुर्गम कोटमीतील ७० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी; गडचिरोली पोलीस दलाचा स्तुत्य उपक्रम...

दुर्गम कोटमीतील ७० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी; गडचिरोली पोलीस दलाचा स्तुत्य उपक्रम…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

आरोग्य शिबिरातून मोफत औषधोपचारासह शासकीय योजनांचा लाभ; ६ रुग्णांना पुढील उपचारांसाठी शिफारस,

गडचिरोली, 26 ऑक्टोबर 2026::- जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांनाही दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा कोटमी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरात एकूण ७० नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. नागरिकांना मोफत औषधोपचार, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावर यावेळी भर देण्यात आला.

आरोग्य तपासणीसोबत मोफत औषधोपचार :-

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी, औषधनिर्माण अधिकारी प्रकाश दानव आणि अधिपरिचारिका सोनाली कुमरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजेनुसार नागरिकांना मोफत औषधे देण्यात आली. तसेच विविध आजार, पोषणविषयक समस्या आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरादरम्यान सहा नागरिकांना पुढील तपासणी व उपचारांसाठी संबंधित रुग्णालयांत जाण्याची शिफारस करण्यात आली. याशिवाय १३ नागरिकांना एसटी बस स्मार्ट कार्ड काढून देण्यात आले. त्यामुळे आरोग्यसेवांसोबतच नागरिकांना आवश्यक शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

२२५ आरोग्य मेळाव्यांतून ५० हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी :-

गडचिरोली पोलीस दलाकडून दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी सातत्याने आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. सन २०२१ पासून आतापर्यंत आयोजित २२५ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

यासोबतच सहा रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून ४,८६४ युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत ९,९७१ हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून, १,४१२ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या उपक्रमांमुळे दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत होत आहे.

शहीद जवानांच्या बलिदानाची माहिती; पोलीस कार्याविषयी जनजागृती :-

आरोग्य शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनी व विविध माहितीपर बॅनरच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांचे बलिदान, सी-६० जवानांचे शौर्य आणि गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या माध्यमातून पोलीस दलाच्या कार्याबद्दल जनजागृती करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन :-

या आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

पोलीस स्टेशन कोटमीचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक विवेक लोंढे तसेच पोलीस अंमलदारांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे, त्यांना शासकीय योजनांची माहिती देणे आणि पोलीस दल व नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उद्देश ठरला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular