Sunday, October 25, 2026
HomeGadchiroliएटापल्लीतील ३० आदिवासी गावांचा पाणीप्रश्न सुटणार; जलसुरक्षेसाठी ९६० कोटी लिटर जलक्षमता निर्मितीचे...

एटापल्लीतील ३० आदिवासी गावांचा पाणीप्रश्न सुटणार; जलसुरक्षेसाठी ९६० कोटी लिटर जलक्षमता निर्मितीचे उद्दिष्ट…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महत्त्वाकांक्षी कार्यक्रम; ३,१०० हून अधिक कुटुंबांना लाभ, शेती व रोजगाराच्या संधींना मिळणार चालना,

गडचिरोली, 25 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल एटापल्ली तालुक्यात जलसुरक्षा बळकट करण्यासोबतच शेतीची उत्पादकता वाढविणे आणि स्थानिक नागरिकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासन आणि हिंदुस्थान युनिलिव्हर फाउंडेशन (एचयूएफ) यांच्या भागीदारीत हा उपक्रम सुरू असून, तालुक्यातील ३० आदिवासी गावांना याचा लाभ मिळणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत सुमारे ३,००० हेक्टर शेतीक्षेत्राला आणि ३,१०० हून अधिक कुटुंबांना लाभ देण्याचे नियोजन आहे. पाण्याची उपलब्धता वाढविणे, शेतीवरील पावसाचे अवलंबित्व कमी करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य :-

सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्ल्यूओटीआर) यांच्यामार्फत केली जात आहे. पाणलोट क्षेत्र विकास, जलसंधारण, हवामान बदलांशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धती आणि उत्पन्नाचे पर्यायी स्रोत विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

कार्यक्रमांतर्गत तब्बल ९.६ अब्ज म्हणजेच ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे, शेतीची उत्पादकता सुधारणे आणि शेतकऱ्यांना वर्षभर शेती करण्याच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

आतापर्यंत १,०१८ कामे व उपक्रम पूर्ण :-

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १,४४९ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले असून, विविध स्वरूपाची १,०१८ कामे आणि उपक्रम पूर्ण करण्यात आले आहेत. यामध्ये पारंपरिक जलसंधारण संरचनांचे पुनरुज्जीवन, शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार आणि शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांना पीक विविधीकरण, पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती आणि शाश्वत अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन व सहाय्य दिले जात आहे. भात उत्पादनात वाढ करण्यासाठी सुधारित ‘एसआरआय’ लागवड पद्धतीचा अवलंब करण्यासही प्रोत्साहन दिले जात आहे.

शेतीसोबत पूरक व्यवसायांतून उत्पन्नवाढीचा प्रयत्न :-

केवळ शेतीवर अवलंबून न राहता आदिवासी कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी आंबा व फणस लागवड, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, हस्तकला आणि सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यात येत आहे.

महिलांच्या नेतृत्वाखालील उपजीविका आणि उद्योगविषयक उपक्रमांनाही विशेष प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढविण्यासोबत महिलांचा आर्थिक सहभाग बळकट करण्याचा प्रयत्न आहे.

उत्पादनात ४,२०० टनांहून अधिक वाढ अपेक्षित :-

कार्यक्रमाच्या नियोजनानुसार, कृषी आणि संलग्न क्षेत्रांतील उत्पादनात ४,२०० टनांहून अधिक वाढ अपेक्षित आहे. तसेच सहभागी कुटुंबांना एकत्रितपणे अंदाजे १५ कोटी १२ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जलसंधारण, शाश्वत शेती आणि पूरक व्यवसाय यांचा समन्वय साधणारा हा कार्यक्रम एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. मात्र, या उपक्रमाचे प्रत्यक्ष यश जलसाठ्यांची निर्मिती, सिंचन सुविधांचा प्रभावी वापर, स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी कितपत टिकाऊ ठरतात, यावर अवलंबून राहणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular