Tuesday, October 27, 2026
HomeGhotवनदाव्यासाठी शेतकऱ्यांची वनविभागाकडे धाव! GPS नकाशा, गुगल अर्थ व नमुना ‘अ’ मिळण्यात...

वनदाव्यासाठी शेतकऱ्यांची वनविभागाकडे धाव! GPS नकाशा, गुगल अर्थ व नमुना ‘अ’ मिळण्यात अडचणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

भाडभीडी (बी) येथील शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर; राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची तातडीने दखल, वनाधिकाऱ्यांना निवेदन,

गडचिरोली /घोट, 26ऑक्टोबर 2026::-चामोर्शी तालुक्यातील भाडभीडी (बी) येथील वनदावा करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा प्रश्न समोर आला आहे. वनदावा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले GPS नकाशे, गुगल अर्थ नकाशे आणि नमुना ‘अ’ उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (असो.), नवी दिल्ली, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आली आहे.

भाडभीडी (बी) येथील शेतकऱ्यांना वनहक्क दाव्यांसाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी संबंधित वनपरिक्षेत्राधिकारी मल्लेलवार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची समस्या मांडली.

यावेळी या प्रश्नासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनाही भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. तसेच भाडभीडी (बी) येथील संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन बैठक आयोजित करण्यात आली आणि मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले.

वनदावा प्रक्रिया पूर्ण करताना शेतकऱ्यांना आवश्यक नकाशे व कागदपत्रांसाठी वारंवार अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी हेलपाटे कशाला?:-

वनहक्क दावे करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित वनविभागाने या प्रकरणात योग्य समन्वय साधून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात आणि वनदावा प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. आता संबंधित विभाग याबाबत कोणती कार्यवाही करतो, याकडे भाडभीडी येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

संघटनेचे पदाधिकारी उपस्थित :-

या वेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, युवा मोर्चा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद किरमे, सुरेश पाटील गुंतीवार, श्रीकांत वैरागडे, देविदास कुकडे, वासुदेव वैरागडे, विठ्ठल बुरांडे, ऋषी वासेकर, दिलीप देशमुख, महेश देशमुख, बंडू देशमुख, एकनाथ वासेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वनदावा करणाऱ्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन त्यांची अडचण दूर करावी, हीच या निवेदनामागील प्रमुख मागणी आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular