VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
माचुवंचा जंगलात गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई; ५ अग्निशस्त्रांसह मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत,
गडचिरोली, 29 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, माओवाद्यांनी जंगलात जमिनीखाली गुप्तपणे पुरून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीस दलाने जप्त केले आहे. वांगेतुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माचुवंचा जंगल परिसरात २७ ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण पाच अग्निशस्त्रांसह क्लेमोर, स्फोटके, सुतळी बॉम्ब, वायरलेस माईक सेट आणि माओवादी गणवेशाचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे विशेष मोहीम :-
माचुवंचा जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्रे व स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २७ ऑक्टोबर रोजी पहाटे विशेष अभियान पथकाच्या चार तुकड्या आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाची (BDDS) एक तुकडी जंगल परिसरात शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आली.
विशेष अभियान पथकाने परिसरात शोधमोहीम राबविली, तर बीडीडीएसच्या जवानांनी संशयित ठिकाणांची कसून तपासणी केली. यावेळी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि विविध प्रकारचे माओवादी साहित्य आढळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले.
पाच अग्निशस्त्रांसह स्फोटक साहित्य जप्त
या कारवाईत पोलिसांनी पुढील साहित्य हस्तगत केले :-

– १२ क्लेमोर
– १ नग १२ बोअर रायफल
– ३ सिंगल शॉट रायफल
– १ एअरगन
– १ बॉटलमधील स्फोटक साहित्य
– १ जिवंत क्लेमोर स्फोटक
– १ वायरलेस माईक सेट
– १ हत्याराचा लोअर हँडगार्ड
– १०० सुतळी बॉम्ब
– माओवादी गणवेशासाठी हिरव्या रंगाच्या कापडाच्या ५ जोड्या
– इतर माओवादी साहित्य
जप्त करण्यात आलेल्या साहित्यापैकी स्फोटक स्वरूपाचे व धोकादायक साहित्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे जंगल परिसरात लपवून ठेवण्यात आलेला शस्त्रसाठा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई :-
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक, गडचिरोली, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कौतुक केले. माओवाद्यांकडून सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी तसेच घातपाती कारवायांसाठी वापरले जाऊ शकणारे साहित्य जप्त झाल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
