Thursday, October 29, 2026
HomeNagapurपदवीधर निवडणुकीत काँग्रेसचा विजयाचा झेंडा! अभिजीत वंजारी पुन्हा विजयी...

पदवीधर निवडणुकीत काँग्रेसचा विजयाचा झेंडा! अभिजीत वंजारी पुन्हा विजयी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

सुधाकर कोहळेंचा पराभव; ३,२७१ मतांच्या फरकाने वंजारींची बाजी,

नागपूर, 29 ऑक्टोबर 2026::-नागपूर विभाग विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. तब्बल ४१ तासांहून अधिक काळ चाललेल्या अटीतटीच्या मतमोजणीनंतर वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. या निवडणुकीत वंजारी यांना एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली, तर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमधील मतांचा फरक ३ हजार २७१ इतका राहिला.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिजीत वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले.

४१ तासांच्या मतमोजणीनंतर निकाल स्पष्ट :-

नागपूर येथील मानकापूर विभागीय क्रीडा संकुलात मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता ८४ टेबलवर मतमोजणीला सुरुवात झाली. पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी पसंतीक्रमानुसार होत असल्याने निकालासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. अखेर ४१ तासांहून अधिक काळ चाललेल्या मतमोजणीनंतर विजयाचे चित्र स्पष्ट झाले.

पहिल्या पसंतीक्रमाच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा गाठता आला नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी व बाद फेरी घेण्यात आली.

१५ हजारांहून अधिक मते अवैध :-

मतमोजणीदरम्यान एकूण १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली, तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली. द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरीतही कोणत्याही उमेदवाराला निर्धारित मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेऱ्यांमध्ये सर्वाधिक ६७ हजार २३१ मते मिळविणारे अभिजीत वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले.

२३ ऑक्टोबरला झाले होते मतदान :-

भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर रोजी नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडले. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी सुरू झाली आणि ४१ तासांहून अधिक काळानंतर निकाल जाहीर झाला.

या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, विभागातील विविध जिल्ह्यांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अटीतटीच्या लढतीत विजय मिळवत अभिजीत वंजारी यांनी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकविला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular