Saturday, October 31, 2026
HomeEtapalliएटापल्लीत पोलिसांची मोठी कारवाई; २७.७० लाखांचा अवैध दारूसाठा जप्त...

एटापल्लीत पोलिसांची मोठी कारवाई; २७.७० लाखांचा अवैध दारूसाठा जप्त…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

दोन स्कॉर्पिओ वाहनांसह देशी दारूचा साठा हस्तगत; सहा आरोपी अटकेत, तिघांचा शोध सुरू,

गडचिरोली, 31 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत एटापल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन स्कॉर्पिओ वाहनांसह अवैध देशी दारूचा साठा व सात मोबाईल फोन असा एकूण २७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी एटापल्ली पोलीस पथक रात्रीच्या गस्तीवर असताना गोपनीय बातमीदारामार्फत मौजा जीवनगट्टा गावात दोन संशयित वाहनांमधून अवैध देशी दारूची वाहतूक व उतराई सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जीवनगट्टा ते बारसेवाडा मार्गावर सापळा रचला.

काही वेळातच पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ घटनास्थळी आली. त्यानंतर लगेचच काळ्या रंगाची दुसरी स्कॉर्पिओ तेथे दाखल झाली. पांढऱ्या स्कॉर्पिओमधून दारूच्या पेट्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये भरल्या जात असतानाच पोलिसांची चाहूल आरोपींना लागली. त्यामुळे त्यांनी वाहनांसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहनांना घेराव घालत आरोपींचा डाव उधळून लावला. यावेळी सहा जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले, तर अंधाराचा फायदा घेत दोन जण घटनास्थळावरून पसार झाले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश प्रशांत मुजुमदार (वय ३२, रा. एटापल्ली), अफसर शेख हुसेन (वय ३६, रा. नागपूर), प्रशांत बजरंग आंबटकर (वय ४३, रा. समुद्रपूर, जि. वर्धा), पंकज शामल बारई (वय २९, रा. जांभियागट्टा, जि. गडचिरोली), तुषार मिहीर रॉय (वय २५, रा. पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड, ह.मु. गडचिरोली) आणि सुरत सत्यजित मंडल (वय २१, रा. पाखांजूर, जि. कांकेर, छत्तीसगड, ह.मु. गडचिरोली) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपींनी एकूण ६० पेट्या देशी दारू आणल्याचे सांगितले. त्यापैकी २९ पेट्या जीवनगट्टा येथील संतोष नरोटे याच्या घरी उतरविल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत दोन्ही वाहनांची तपासणी केली तसेच संतोष नरोटे याच्या घराची झडती घेतली. यामध्ये रॉकेट देशी दारू संत्रीचे २२ बॉक्स (किंमत २ लाख २० हजार रुपये), प्रीमियम नं. १ कोकण देशी दारूचे १८ बॉक्स (किंमत १ लाख ८० हजार रुपये), पांढरी स्कॉर्पिओ (८ लाख रुपये), काळी स्कॉर्पिओ (१५ लाख रुपये) आणि सात मोबाईल फोन (७० हजार रुपये) असा एकूण २७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात संतोष नरोटे (रा. जीवनगट्टा), गौरव प्रभाकर माकोडे (रा. वर्धा) आणि मिथुन निर्मल मलिक (रा. गट्टा-जांभिया) हे तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध यापूर्वीही दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एटापल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११२(२) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या संबंधित कलमांनुसार नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई :-

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट व पोलीस अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular