Friday, October 30, 2026
HomeEtapalliझोपडीतून अंगणवाडीची सुटका! चोकेवाडा टोला येथील बालकांना मिळाला पक्क्या इमारतीचा आधार...

झोपडीतून अंगणवाडीची सुटका! चोकेवाडा टोला येथील बालकांना मिळाला पक्क्या इमारतीचा आधार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

CPI च्या निवेदनाला यश; जिल्हा परिषद शाळेच्या अतिरिक्त खोलीत मिनी अंगणवाडीचे स्थलांतर,

गडचिरोली /एटापल्ली, 30 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या चोकेवाडा टोला येथील मिनी अंगणवाडी अखेर झोपडीतून बाहेर पडली आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (CPI) सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, या अंगणवाडीचे जिल्हा परिषद शाळेच्या अतिरिक्त खोलीत स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे येथे शिक्षण आणि पोषणासाठी येणाऱ्या सुमारे १० बालकांना सुरक्षित जागेचा आधार मिळाला आहे.

ग्रामपंचायत चोकेवाडा अंतर्गत येणाऱ्या चोकेवाडा टोला येथे मिनी अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध नसल्याने अनेक दिवसांपासून झोपडीतच अंगणवाडी भरविली जात होती. परिणामी, लहान बालकांना पोषण आहार, आरोग्यविषयक सेवा आणि पूर्वप्राथमिक शिक्षण देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बालकांच्या सुरक्षिततेचा आणि सुविधांचा प्रश्न लक्षात घेऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या गडचिरोली जिल्हा समितीने हा मुद्दा प्रशासनाकडे लावून धरला होता.

यासंदर्भात CPI च्या वतीने बाल विकास प्रकल्प अधिकारी, एटापल्ली यांच्याकडे निवेदन सादर करून अंगणवाडीसाठी सुरक्षित आणि योग्य जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत बाल विकास अधिकारी श्री. विद्याधर बुरीवार यांनी चोकेवाडा टोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन अंगणवाडीच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर तातडीने कार्यवाही करीत मिनी अंगणवाडीचे जिल्हा परिषद शाळेच्या अतिरिक्त खोलीत स्थलांतर करण्यात आले.

या कार्यवाहीची माहितीही त्यांनी CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांना दिली. अनेक दिवसांपासून झोपडीत सुरू असलेल्या अंगणवाडीला आता पक्क्या इमारतीतील खोली उपलब्ध झाल्याने बालकांसह पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मागणी मान्य झाल्याने CPI कडून समाधान :-

यावेळी CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “चोकेवाडा टोला येथील मिनी अंगणवाडी झोपडीत सुरू असल्यामुळे लहान बालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. हा प्रश्न गांभीर्याने घेऊन CPI च्या वतीने निवेदन देत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर बाल विकास अधिकारी श्री. विद्याधर बुरीवार यांनी प्रत्यक्ष गावभेट देऊन अंगणवाडीचे जिल्हा परिषद शाळेच्या अतिरिक्त खोलीत स्थलांतर केले. बालकांना सुरक्षित आणि पक्क्या इमारतीत बसण्याची सुविधा मिळाल्याने आम्हाला समाधान आहे. आमच्या मागणीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे आभार.”

या पाठपुराव्यात CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार तसेच गावकऱ्यांनी सहभाग घेतला.

एका निवेदनातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून दुर्गम भागातील चिमुकल्यांच्या सुविधेचा प्रश्न मार्गी लागल्याने या कार्यवाहीचे परिसरातून स्वागत होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular