VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांनी औक्षण करून दिले आशीर्वाद; राजपरिवारासह मान्यवरांची उपस्थिती, नाईट ऑर्केस्ट्राने रंगली जन्मदिनाची मैफल,
गडचिरोली /अहेरी, 31 ऑक्टोबर 2026::-अहेरी इस्टेटच्या ऐतिहासिक परंपरेचा साक्षीदार असलेल्या रुक्मिणी महालात युवानेते तथा राजे धर्मराव शिक्षण मंडळाचे सचिव कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात साजरा करण्यात आला.

या सोहळ्यानिमित्त संपूर्ण रुक्मिणी महाल परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजपरिवारातील सदस्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षण मंडळाचे कर्मचारी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

जन्मदिन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे राजमाता राणी रुक्मिणीदेवी यांच्या हस्ते कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. यावेळी राजमातांनी त्यांना आशीर्वाद देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर केक कापून जन्मदिनाचा आनंद साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी त्यांची भेट घेत शुभेच्छांचा वर्षाव केला.
कुमार अवधेशरावबाबा आत्राम हे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे लहान बंधू असून, राजे धर्मराव शिक्षण मंडळाच्या सचिवपदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. त्यामुळे जन्मदिनानिमित्त शिक्षण मंडळाच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचारी वर्गानेही उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या जन्मदिन सोहळ्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचीही विशेष जोड देण्यात आली होती. रुक्मिणी महालाच्या भव्य पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या नाईट ऑर्केस्ट्रा या संगीत कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. संगीताच्या सुरांनी महाल परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. अहेरी नगरीतील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम, राजमाता राणी रुक्मिणीदेवी, प्रवीणरावबाबा आत्राम यांच्यासह राजपरिवारातील सदस्य, राजे धर्मराव शिक्षण मंडळाचे पदाधिकारी व कर्मचारी, भाजप तसेच नाविसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजमातांचे आशीर्वाद, राजपरिवाराचे स्नेह, मान्यवरांच्या शुभेच्छा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत अशा आनंददायी वातावरणात ऐतिहासिक रुक्मिणी महालातील कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांचा जन्मदिन सोहळा अविस्मरणीय ठरला.
