VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
चामोर्शी मार्गावरील एचपी पेट्रोल पंपासमोर काळाचा घाला; बापलेकांवर दुःखाचा डोंगर, अनकोडा गाव शोकसागरात,
चामोर्शी, दि. १० नोव्हेंबर 2026:- आष्टी येथील चामोर्शी मार्गावरील एचपी पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून अनकोडा गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजू येलमुले आणि त्यांचा मुलगा संदीप राजू येलमुले हे अनकोडा येथून दुचाकीने आष्टीच्या दिशेने येत होते. याचवेळी श्याम विश्वास हे आष्टी येथून आपल्या गावाकडे दुचाकीने जात असताना चामोर्शी मार्गावरील एचपी पेट्रोल पंपासमोर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की, या अपघातात राजू येलमुले आणि श्याम विश्वास यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप राजू येलमुले हे गंभीर जखमी झाले. या घटनेने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेत जखमी संदीप यांना लॉयड मेटलच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी आष्टी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
बापलेकांचा प्रवास ठरला अखेरचा; येलमुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर :-
एकाच अपघातात राजू येलमुले आणि श्याम विश्वास यांचा मृत्यू, तर संदीप यांची मृत्यूशी झुंज सुरू असल्याने अनकोडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बापलेकांचा आष्टीकडे सुरू असलेला प्रवास क्षणात काळाच्या पडद्याआड गेला. या दुर्दैवी घटनेमुळे येलमुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातील नागरिकांकडून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.
