VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
अतिदुर्गम भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी; व्यसनांपासून दूर राहून खेळात करिअर घडवा – अजयभाऊ कंकडालवार यांचे आवाहन,
गडचिरोली /भामरागड, 11 नोव्हेंबर 2026::-भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोडराज येथे क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला असून, ग्रामीण युवकांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पामूलगौतम क्रीडा मंडळ, धोडराज यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
यावेळी प्रमुख सहउद्घाटक म्हणून भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी आणि सुधाकर कुरसामी उपस्थित होते.

अतिदुर्गम भागातील युवकांमध्ये असलेली क्रीडाक्षमता आणि सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे, तसेच ग्रामीण भागात क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला भामरागड तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धेतील प्रथम पारितोषिक काँग्रेस नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक कर्मचारीवृंद व ग्रामसभा धोडराज यांच्या वतीने, तर तृतीय पारितोषिक भामरागड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बोगमी व प्रसाद कुडयामी यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

उद्घाटनप्रसंगी युवकांना मार्गदर्शन करताना डॉ. अजयभाऊ कंकडालवार म्हणाले की, भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील युवकांमध्ये प्रचंड गुणवत्ता, जिद्द आणि क्षमता आहे. ग्रामीण क्रीडा स्पर्धांमुळे या युवकांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. खेळामुळे केवळ शारीरिक तंदुरुस्तीच नव्हे, तर शिस्त, सांघिक भावना आणि एकोपा निर्माण होतो. युवकांनी मोबाईलचा अतिवापर आणि व्यसनांपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात आपले करिअर घडवावे. पामूलगौतम क्रीडा मंडळाने केलेले आयोजन कौतुकास्पद असून, मंडळाच्या तसेच येथील युवकांच्या पाठीशी आपण सदैव खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कंकडालवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले :-
या उद्घाटन सोहळ्याला प्रसाद कुडयामी, भामरागड नगरपंचायतीचे उपाध्यक्ष विष्णू मडावी, वनहक्क समितीचे अध्यक्ष राजू कुरसामी, माजी नगराध्यक्ष राजू वड्डे, माजी सरपंच रमेश पुंगाठी, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रभाकर मडावी, परायणार ग्रामपंचायतीचे सरपंच नंदू महाका, महेश वरसे, भामरागड ओबीसी सेल काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण मोगरकर, आकाश मोगरकर, पत्रकार कविश्वर मोतकुरवार यांच्यासह धोडराज, भामरागड व परिसरातील शेकडो क्रीडाप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेमुळे धोडराज परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, स्पर्धेतील सामन्यांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
