VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उद्घाटन; गोमातेचे पूजन करून गोवंश संवर्धनाचा दिला संदेश,
गडचिरोली /चामोर्शी, 10 नोव्हेंबर 2026:- चामोर्शी शहरातील कृष्णनगर परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ईस्कॉन प्रभुदास गोशाळेचा उद्घाटन सोहळा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी गोमातेचे विधिवत पूजन करून गोसेवा, गोवंश संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
उद्घाटनानंतर माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी गोशाळेची पाहणी करून तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, गोसेवा ही भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व असून, गोवंशाचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. गोशाळांच्या माध्यमातून निराधार गोवंशाला आधार मिळण्यासोबतच गोसेवेचे कार्य अधिक व्यापक होण्यास मदत होते. अशा सेवाभावी उपक्रमांना समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्याला भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष बाबुराव कोहळे, उमेशजी कुकडे, देवेंद्रजी दुधबळे, प्रज्वल सोमनकर, विशाल सोमनकर, वैभव सोमनकर, प्रियंका पवार, यशवंत सोमनकर, साईनाथ लटारे, नारायण पाटील नैताम, रामदासजी गोवारी, अशोकजी लटारे, चेतन चापले, दीपक राऊत यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कृष्णनगर येथे सुरू झालेल्या ईस्कॉन प्रभुदास गोशाळेमुळे परिसरात गोसेवेच्या कार्याला प्रोत्साहन मिळणार असून, गोवंशाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या सामाजिक उपक्रमाला नवी दिशा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
