VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
ग्रामस्थांच्या तक्रारींची CPI कडून गंभीर दखल; ट्रान्सफॉर्मरपासून विद्युत वाहिन्यांपर्यंत तपासणीची मागणी, कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी सचिन मोतकुरवार यांचा पाठपुरावा,
गडचिरोली /एटापल्ली,११ नोव्हेंबर २०२६::-एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली गावातील अनियमित वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वारंवार वीज खंडित होण्याच्या या गंभीर समस्येविरोधात आता भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) आक्रमक झाली आहे. ग्रामस्थांनी स्वतः CPI च्या पदाधिकाऱ्यांना गावात बोलावून आपली व्यथा मांडल्यानंतर पक्षाच्या वतीने महावितरणच्या एटापल्ली कार्यालयावर निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
गुरुपल्ली गावात वारंवार वीज ये-जा करत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास प्रभावित होत आहे. अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्येची दखल घेत CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी कॉ. सुरज जक्कुलवार व स्थानिक नागरिकांसह महावितरणच्या एटापल्ली उपविभागीय कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले. गावातील वीज समस्येचा केवळ तात्पुरता बंदोबस्त न करता तांत्रिक दोष शोधून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनातून गावातील विद्युत ट्रान्सफॉर्मरची क्षमता व कार्यक्षमता तपासणे, विद्युत वाहिन्या, खांब, जंपर, फ्यूज तसेच इतर विद्युत उपकरणांची सखोल तपासणी करणे, वीजपुरवठा खंडित होण्यामागील तांत्रिक कारणे शोधून दोष दूर करणे आणि नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच करण्यात आलेल्या दुरुस्तीचा सविस्तर लेखी अहवाल CPI ला देण्याची मागणीही करण्यात आली.
महावितरणचे निर्देश; प्रत्यक्ष दुरुस्तीवर लक्ष :-
CPI च्या निवेदनाची दखल घेत महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना गुरुपल्ली गावात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. गावातील वीजपुरवठा नियमित व सुरळीत राहील, याची दक्षता घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत CPI चा पाठपुरावा सुरूच राहणार – कॉ. सचिन मोतकुरवार :-
यावेळी बोलताना CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “गुरुपल्ली येथील नागरिकांनी स्वतः आम्हाला गावात बोलावून वीजपुरवठ्याची समस्या मांडली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडित हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामस्थांनी आमच्यावर विश्वास दाखवून समस्या मांडली, त्यामुळे आम्ही तातडीने महावितरणकडे निवेदन सादर केले. महावितरणने दुरुस्तीचे निर्देश दिले असले, तरी प्रत्यक्षात वीजपुरवठा नियमित होणे गरजेचे आहे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता तांत्रिक दोष शोधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. गुरुपल्ली गावाला नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळेपर्यंत भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा पाठपुरावा सुरूच राहील.”
गुरुपल्ली गावातील वीज समस्येवर महावितरणने तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमचा निकाली काढावा, अशी ठाम मागणी CPI आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.
यावेळी CPI चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, कॉ. सुरज जक्कुलवार यांच्यासह गुरुपल्ली येथील नागरिक उपस्थित होते.
