Friday, November 13, 2026
HomeGadchiroliजनजातीय गौरव दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा सविस्तर आढावा...

जनजातीय गौरव दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा सविस्तर आढावा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

१५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीचा मुख्य सोहळा; स्टेडियम, सुरक्षा, आसनव्यवस्था व वाहतूक नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी,

गडचिरोली, 12 नोव्हेंबर 2026::- भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या जनजातीय गौरव दिनाच्या भव्य शासकीय सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गुरुवारी जिल्हा क्रीडा संकुलातील कार्यक्रमस्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

गडचिरोली येथे १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा मुख्य सोहळा १५ नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन करून मार्गदर्शन करणार आहेत. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.

जिल्हाधिकारी पंडा यांनी कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या भव्य स्टेडियमची पाहणी करत मुख्य मंचाची उभारणी, मान्यवरांची आसनव्यवस्था, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, प्रवेश व निर्गमन मार्ग तसेच इतर मूलभूत सुविधांची माहिती घेतली. कार्यक्रमासाठी सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

देशस्तरीय महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेलाही विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुरक्षा नियोजन, प्रवेश नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि अन्य संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती घेतली. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.

या पाहणीदरम्यान अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण एम. यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा जनजातीय गौरव दिनाचा सोहळा भव्य आणि यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, संपूर्ण यंत्रणा तयारीला लागली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular