Monday, November 16, 2026
HomeGadchiroliजनजातीय गौरव दिन सोहळ्यात राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती; भगवान बिरसा...

जनजातीय गौरव दिन सोहळ्यात राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची विशेष उपस्थिती; भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

१५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत आदिवासी संस्कृती, अस्मिता आणि शौर्याचा भव्य जागर,

गडचिरोली, 16 नोव्हेंबर 2026 :-क्रांतिसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या भव्य सोहळ्याला माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपस्थिती दर्शवून भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले.

आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी, जल-जंगल-जमीन आणि मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्षाची मशाल पेटवणारे भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य आजही संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात आदिवासी समाजाची गौरवशाली संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि संघर्षमय इतिहासाचा गौरव करण्यात आला.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेला लढा हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा आणि स्वाभिमानाने जगण्याच्या अधिकाराचा प्रेरणादायी इतिहास आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा पुढे नेत आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हेही ऑनलाइन उपस्थित होते.

या ऐतिहासिक सोहळ्याला केंद्रीय जनजातीय कार्यमंत्री जुएल ओराम, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार मायाताई इवनाते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, केंद्रीय आदिवासी कार्य सचिव रंजना चोपडा, राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, माजी खासदार अशोक नेते यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करून आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देण्यात आला. आदिवासी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांच्या रक्षणासाठी त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही तितकीच महत्त्वपूर्ण असल्याचा संदेश या सोहळ्यातून अधोरेखित झाला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular