VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक; वनहक्क पट्टे, दुष्काळ, आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर शासनाचे वेधले लक्ष,
गडचिरोली, 16 नोव्हेंबर 2026 :-भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यात आले. जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मांडत येत्या दोन महिन्यांत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. अन्यथा जिल्हाभर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.
गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल आणि दुर्गम असल्याने येथील नागरिकांना आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. आदिवासी बांधवांचे प्रलंबित वनहक्क पट्टे तातडीने वितरित करावेत, शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त पदे भरावीत, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यावा, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

तसेच मुरूमगाव-धानोरा-गडचिरोली मार्गासह जिल्ह्यातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून नवीन रस्त्यांची निर्मिती करावी, वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता त्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी मागणीही शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ. बनसोड, जिल्हाप्रमुख पवन गेडाम, विधानसभा संघटक नंदूभाऊ कुमरे, माजी जिल्हा संघटक विलासजी ठोंबरे, तालुकाप्रमुख मनोज पोर्टे, गणेशामजी कोलते, गोविंदाजी ब्राह्मणवाडे, संतोष लोणबले, किरण शेडमाके, विलास ठाकरे, आशिष काडे, सदाशिव गाणे, पिल्लारेजी, काळबांडेजी, महिला आघाडीच्या विनुताई ढवगाडे, युवासेना जिल्हाप्रमुख गुणाजी भोरकुटे, उपजिल्हाप्रमुख चेतन उरकुडे, युवासेना तालुकाप्रमुख वैभव सातपुते, शहरप्रमुख अमोलजी कुडमेते, अतुल नैताम, तुषारजी मडावी यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी व युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
दोन महिन्यांची मुदत; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन :-

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी बांधव आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन येत्या दोन महिन्यांत त्यांचे निराकरण करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दिलेल्या मुदतीत मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडून चक्काजाम करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.
जिल्ह्यातील जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी आणि प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी यावेळी मांडली.
