Monday, November 16, 2026
HomeGadchiroliजिल्हा पूर्ण दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना बोनस द्या! खासदार डॉ. नामदेव किरसान...

जिल्हा पूर्ण दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना बोनस द्या! खासदार डॉ. नामदेव किरसान यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

सुपीक जमिनींचे भूसंपादन टाळा, आदिवासी शिक्षण व आश्रमशाळांचा दर्जा उंचवा; जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष,

गडचिरोली, 16 नोव्हेंबर 2026 :-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी समाज आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली येथे भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करत त्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

यावेळी खासदार डॉ. किरसान यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून संपूर्ण जिल्हा पूर्ण दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी केली. तसेच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष बोनस जाहीर करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि औद्योगिक विकासासाठी (एमआयडीसी) होणाऱ्या भूसंपादनाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. विकासकामांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक व कसदार जमिनींचे अधिग्रहण करू नये, शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करूनच विकास प्रकल्प राबवावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

याशिवाय जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच जिल्ह्यातील आश्रमशाळांचा शैक्षणिक व भौतिक दर्जा उंचावण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही खासदारांनी केली.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच शेतकरी, आदिवासी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे तातडीने निराकरण करावे, अशी आग्रही भूमिका खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular