VAINGANGA NEWS 24 / विशेष प्रतिनिधी,
कृष्णा गजबे – आरमोरी विधानसभा क्षेत्र,मनोहर पोरेटी – गडचिरोली विधानसभा क्षेत्र, हणमंतू मडावी , अंब्रीशराव आत्राम,भाग्यश्री आत्राम,दिपक आत्राम- अहेरी विधानसभा क्षेत्र पराभव स्विकारावा लागला.
गडचिरोली, २४ नोव्हेंबर २०२४ ::- जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली व अहेरी असे तीन विधानसभा क्षेत्र असून, गडचिरोलीतून भाजपाचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे, तर अहेरी विधानसभा क्षेत्राच महायुतीचे धर्मरावबाबा आत्राम व आरमोरी मतदारसंघातून काँग्रेसचे रामदास मसराम विजयी झालेत, तर भाजपाचे उमेदवार कृष्णा गजबे, काँग्रेसचे मनोहर पोरेटी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भाग्यश्री आत्राम, अपक्ष उमेदवार अम्ब्रिशराव महाराज या दिग्गजांना पराभवाचा चेहरा बघावा लागला.आरमोरी मतदारसंघातून कृष्णा गजबे यांना यावेळी हॅट्रीकची संधी होती. मात्र, या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रामदास मसराम ६ हजार २१० मतांनी विजयी झाले. मसराम यांना ९८ हजार ५०९ मते, तर गजबे यांना ९२ हजार २९९ मते मिळाली आहेत.अतिशय चुरशीची ठरलेल्या या निवडणुकीत मतदारसंघातून गजबे यांच्या विजयाची हॅट्रीक रोखण्यात मसराम यांना यश आले आहे. या मतदारसंघात सर्वच राजकीय जाणकारांचे अंदाज चुकले असून, गजबेंच्या पराभवाने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.अहेरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अजित पवार गटाचे धर्मरावबाबा आत्राम यांनी ५३ हजार ९७८ मते घेऊन आपली कन्या भाग्यश्री आत्राम व पुतण्या अम्ब्रिशराव महाराज या दोघांनाही पराभवाचा चेहरा दाखविला आहे. या मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरली होती, तर महायुतीमुळे भाजपाचे नेते अम्ब्रिशराव आत्राम यांना भाजपाने तिकिट न दिल्यामुळे ते महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उभे राहिले होते. मात्र, मतदारांनी धर्मरावबाबा आत्राम यांच्या बाजूने कौल दिला आणि ते १६ हजार ८५७ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. या मतदारसंघात दुसऱ्या स्थानावर अपक्ष उमेदवार अम्ब्रिशराव आत्राम राहिले असून, त्यांना ३७ हजार १२१ मते मिळाली, तर भाग्यश्री आत्राम या तिसऱ्या स्थानावर राहिल्या असून, त्यांना ३५ हजार ५३५ मते मिळाली आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार हनुमंतू मडावी यांना २७ हजार ३४ मते मिळाली आहेत.या मतदारसंघाकडे अख्ख्या गडचिरोलीचे लक्ष लागले होते. काका-पुतण्या, भाऊ-बहीण, मुलगी- वडील अशा तिरंगी लढतीत धर्मरावबाबा आत्राम यांनी विजयी होत बाप शेवटी बापच असतो हे दाखवून दिले आहे.
