Sunday, May 24, 2026
HomeGadchiroli"सेवा पंधरवाडा"तून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहचविण्याचे सुक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी...

“सेवा पंधरवाडा”तून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहचविण्याचे सुक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

‘रस्ता अदालत’, ‘सर्वांसाठी घरे’ आणि ‘नावीन्यपूर्ण उपक्रम’ jराबविणार,

गडचिरोली, ०२ सप्टेंबर २०२५::- महसूल विभागातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” राबविण्यात येणार आहे. महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवत या पंधरवड्यात शेवटच्या घटकापर्यंत शासकीय सेवा पोहचिण्याच्या उद्देशाने करावयाची सर्व कामे वेळेवर आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठीचे सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज महसूल प्रशासनाला दिल्या.

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय असोले, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव (गडचिरोली), अरूण एम. (चामोर्शी), अनुष्का शर्मा (देसाईगंज), निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख विजय भालेराव, जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख तसेच दूरदृष्य प्रणाली द्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.या अभियानांतर्गत पुढीलप्रमाणे तीन टप्प्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

पहिला टप्पा (१७ ते २२ सप्टेंबर, २०२५): पाणंद रस्ते मोहीम:-

या टप्प्यात पाणंद/शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, त्यांचे सर्वेक्षण करणे, गाव नकाशावर चिन्हांकित करणे, आणि त्यांची नोंद करणे यासारख्या कामांवर भर दिला जात आहे. तसेच, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्रे घेणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ‘रस्ता अदालत’ आयोजित करणे यावर कार्यवाही करण्यात येईल.

दुसरा टप्पा (२३ ते २७ सप्टेंबर, २०२५): “सर्वांसाठी घरे” आणि पट्टे वाटप मोहीम:-

या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत घरे बांधण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींचे पट्टे वाटप करणे. तसेच, शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित करणे व या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टेही वाटप केले जाणार आहेत.

तिसरा टप्पा (२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२५): नावीन्यपूर्ण उपक्रम:-

या टप्प्यात जिल्हाधिकारी स्थानिक गरजा आणि भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे सांगितले. जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्व संबंधित विभागांना या अभियानासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले आहे. अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाईल. तसेच, स्थानिक लोकप्रतिनिधी यांना या अभियानात सहभागी करून घेण्याची निर्देशही त्यांनी दिले. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय असोले यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीला महसूल विभागाचे सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular