VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी, १२ ऑक्टोबर २०२५::- “आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर ५१ पैकी ३२ जागा मागू; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढेल,” असा ठाम इशारा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी रविवारला चामोर्शीत जन कल्याण यात्रेत दिला.”अहेरीत इतर पक्ष आहेतच कुठे?” असे विचारत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर उपरोधिक टीका केली.ते चामोर्शी नगरपंचायत प्रांगणात झालेल्या जनकल्याण यात्रेच्या सभेत बोलत होते.
या सभेला आमदार अमोल मिटकरी, सिने अभिनेत्री अमृता खानविलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती युधिष्ठिर विश्वास, प्रदेश सचिव प्रा. ऋषिकांत पापडकर, राष्ट्रीवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर, माजी जि.प. उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे, प्रदेश संघटक सचिव लौकिक भिवापुरे, प्रदेश सचिव प्रा. ऋषिकांत पापडकर,नाना नाकाडे, तालुकाध्यक्ष निशांत नैताम, नगरसेवक राहुल नैताम, ॲड. डिंपल उंदिरवाडे, डॉ. नोमेश जुवारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेपूर्वी शहरातून पायी फेरी काढण्यात आली.धर्मरावबाबा आत्राम यांनी या वेळी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले, “मला विधानसभेत पराभूत करण्यासाठी भाजपने माझे पुतणे अम्ब्रीशराव आत्राम यांना डमी उमेदवार म्हणून उभे केले. पाच कोटी रुपये खर्च केले, तरी जनतेने माझ्या पाठिशी ठाम उभे राहून विजय मिळवून दिला.” ते पुढे म्हणाले, “कोनसरी येथील लोहनिर्मिती प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार मिळायला हवा.

भेंडाळा परिसरातील १४ गावांची जमीन उद्योगासाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. एक इंचीही जमीन जाऊ देणार नाही; कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आत्राम यांनी यावेळी दिला. सभेला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – मिटकरी“पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, मात्र महायुती सरकारने भरीव मदत केली असून पुढेही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील,” असे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

“गडचिरोली हा क्रांतीचा आणि संघर्षाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार खंबीरपणे सोबत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
सभेतील प्रमुख मुद्दे राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्वबळावर लढणारभाजपवर “डमी उमेदवार” उभा करण्याचा आरोपस्थानिकांना रोजगार, शेतजमिनीचे रक्षण यावर ठाम भूमिकाजनकल्याण यात्रेतून “स्थानिक हक्क” आणि “राजकीय स्वाभिमान” यांचा नारा.
