VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
चामोर्शी – गडचिरोली महामार्गावर ५ तास वाहतूक ठप्प,
आंदोलनात हजारो नागरिकांचा सहभाग,पोलिसांचा तगडा बंदोबस्त,
गडचिरोली/ चामोर्शी,०३ जानेवारी २०२६::- कुनघाडा रै १ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता चामोर्शी – गडचिरोली महामार्गावरील कुनघाडा रै बस थांब्यावर चामोर्शी वरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या भरदार चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे कुनघाडा रै येथील अतुल तुळशीराम कोसमशिल्ले हा गंभीर जखमी झाला असून, त्याला नागपूर येथे हलविण्यात आले आहे. तर संतोष सुधाकर भांडेकर हा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींना न्याय मिळावा या मागणीसाठी कुनघाडा रै येथील हजारो संतप्त नागरिकांनी बस थांब्यावर चक्काजाम आंदोलन केला आहे. यामुळे महामार्गावर जवळपास ५ तास वाहतूक ठप्प पडली होती. आंदोलन कर्त्याना शांत करण्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चामोर्शी तालुक्यात कुनघाडा रै हे गाव बरेच मोठे असून, चामोर्शी – गडचिरोली महामार्गावरून पूर्वेस २ किमी अंतरावर आहे. गावात गडचिरोली वरून येणारी गिलगाव – पोटेगाव व माल्लेर या दोन बसेस सोडले तर चामोर्शी वरून कुठल्याच बसेस नाहीत. कुनघाडा रै परिसरातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना तालुका किंवा जिल्हा ठिकाणावर जाण्यासाठी महामार्गावरील बस थांब्यावर जाऊन बसेसची वाट बघावी लागते. चामोर्शी गडचिरोली महामार्ग सुरू झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. विशेष म्हणजे कुनघाडा रै बस थांब्यावर बिस्वास यांच्या मालकीचा ढाबा असल्यामुळे सकाळ पासून तर रात्रीपर्यंत अनेक जड वाहनांची रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग राहत असल्याने कुनघाडा रै येथून जाणाऱ्या वाहनास हायवेवर चालणारे वाहन निदर्शनास येत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. १ जानेवारी २०२६ रोजी अतुल तुळशीराम कोसमशिल्ले व संतोष सुधाकर भांडेकर हे दोघे दुचाकीने दुपारी १२.३० वाजता कुनघाडा रै वरून चामोर्शीकडे जात असताना बस थांब्याच्या समोरच एका भरधाव चारचाकीने धडक दिल्याने अतुल तुळशीराम कोसमशिल्ले याला डोक्याला मार लागून कानातून रक्तस्राव वाहत असल्याने त्याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे. तर संतोष सुधाकर भांडेकर हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातातील योग्य न्याय मिळावा यासाठी गावातील संतप्त नागरिकांनी चक्काजाम चक्काजाम आंदोलन केला. आंदोलनकर्त्यांनी उग्र रूप धारण केल्यामुळे जवळपास ५ तास वाहतूक ठप्प पडली होती.

आंदोलन स्थळी आ डॉ मिलिंद नरोटे, तहसीलदार घोरुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप, पोलिस निरीक्षक डोंब यांनी भेट दिली. अखेर शिष्टमंडळास जिल्हाधिकाऱ्यांची भेट करून देण्याच्या अटीवर ४.३० वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली.
लायड्स मेटल कंपनीच्या जड वाहनांमुळे चामोर्शी मार्गावर अनेक अपघात होऊन जीवित हानी झाल्यामुळे कंपनीप्रति आंदोलनात रोष व्यक्त केला जात होता.
आंदोलनात सरपंच अलका धोडरे, पोलिस पाटील दिलीप शृंगारपावर, माजी प स सभापती आनंद भांडेकर, माजी जि प सदस्य पितांबर वासेकर, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, सामाजिक उमेश कुकडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष हर्षद भांडेकर, मंगेश वासेकर, भाजपा तालुका सचिव दीपक भांडेकर, मधुकर टिकले, साहिल वडेट्टीवार, अरुण कुनघाडकर, वासुदेव भांडेकर, दिलीप जुवारे, अतुल भांडेकर, खुशाल वासेकर यासह हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते.
आंदोलन कर्त्यांच्या मागण्या :-
जखमींना आर्थिक मदत, जखमींवर योग्य तो उपचार, बस थांब्यावर सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अपघात घडवून आणणाऱ्या वाहनाचा शोध घेऊन वाहन चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, ढाबा मालकास तंबी देण्यात येऊन पार्किंग जड वाहनावर कारवाई करण्यात यावी.
