VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
तपोभूमी समाधीस्थळाचे घेतले दर्शन, भाविकांना दिला श्रद्धेचा संदेश,
चिमुर, ०३ जानेवारी २०२६::- चिमुर तालुक्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तपश्चर्या केलेली पवित्र तपोभूमी म्हणून ओळख असलेल्या गोंदेडा गुंफा येथे दरवर्षी भक्तिभावाने साजरा होणारा ६६ वा गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. या पावन सोहळ्यास माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थिती लावून तपोभूमी समाधीस्थळाचे दर्शन घेतले व आशिर्वाद प्राप्त केला.
यावेळी गुरुकुंज मोझरी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा ओबीसी नेते राजुभाऊ देवतळे आणि राज्य परिषद सदस्य डॉ. श्यामजी हटवादे यांनी मा.खा. डॉ. नेते यांचे पुष्पगुच्छ देऊन आत्मीयतेने स्वागत केले.
यात्रा निमित्ताने उपस्थित भाविकांना संबोधित करताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले,
“चिमुर ही क्रांतीभूमी आहे. या भूमीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी गोंदेडा गुंफा येथे येऊन कठोर तपश्चर्या केली. त्या काळी घनदाट जंगल व हिंस्त्र प्राण्यांचा वावर असतानाही महाराजांनी येथे साधना केली. त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र असून मला दरवर्षी येथे येण्याचे भाग्य लाभते.”
ते पुढे म्हणाले की, चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री तथा महाराष्ट्र निवडणूक प्रमुख मान.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे निवडणूक संदर्भात कार्यक्रम असल्याने उशीर झाला, मात्र उशिरा का होईना गोपाळकाला व दर्शनाचा लाभ मिळाला, याचे समाधान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
याचवेळी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तपोभूमी, गोंदेडा गुंफा यात्रा महोत्सव २०२६ निमित्त उपस्थित सर्व भाविकांना हार्दिक सुभेच्छा दिले.
या प्रसंगी गुरुकुंज मोझरी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राजुभाऊ देवतळे, राज्य परिषद सदस्य डॉ. श्यामजी हटवादे, चिमुर विधानसभा प्रमुख तथा नवनिर्वाचित नगरसेवक गणेशभाऊ तर्वेकर, मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाऊंडेशनचे संस्थापक रोहितभाऊ बोम्मावार,भाजपा युवा नेते बालुभाऊ पिसे, पत्रकार श्रीहरी सातपूते, विलास कोराम तसेच मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त उपस्थित होते.
