VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
“रेल्वे संदर्भात मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांची आज नई दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा व निवेदन सादर केले.”
नई दिल्ली दि.०६ जानेवारी २०२६::- गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल, जंगलव्याप्त व सीमावर्ती भागात वसलेला, अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. नक्षलग्रस्ततेमुळे तसेच अपुऱ्या दळणवळण सुविधांमुळे या जिल्ह्याच्या विकासाला अनेक मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेल्वे प्रकल्पांना प्रत्यक्ष गती मिळावी, या उद्देशाने गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते हे सातत्याने प्रयत्नशील आहेत.
याच विकासदृष्टीतून मा.खा. डॉ. नेते यांनी आज नई दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनीजी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली व लेखी निवेदन सादर केले.
या भेटीत मा.खा.डॉ. नेते यांनी गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक रचना, सामाजिक परिस्थिती तसेच आर्थिक वास्तव मांडत, रेल्वे जोडणीअभावी जिल्ह्याच्या विकासाला येणाऱ्या अडथळ्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास आदिवासी, ग्रामीण व दुर्गम भाग मुख्य प्रवाहाशी जोडले जातील आणि जिल्ह्याचा विकास वेगाने होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात:-
गडचिरोली–चामोर्शी–आष्टी- आलापल्ली–आदिलाबाद,गडचिरोली–धानोरा–छत्तीसगड- भानूप्रतापपूर तसेच गडचिरोली–वडसा (देसाईगंज)
या तीन महत्त्वाकांक्षी व स्वीकृत रेल्वे प्रकल्पांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
या रेल्वे मार्गांमुळे उद्योग, व्यापार, शेती, खनिज वाहतूक, शिक्षण व आरोग्य सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे डॉ. नेते यांनी स्पष्ट केले.
विशेषतः गडचिरोली–वडसा (देसाईगंज) हा रेल्वे मार्ग मंजूर असूनही त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने, हा मार्ग तातडीने व जलद गतीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हा मार्ग पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातील इतर प्रस्तावित रेल्वे मार्गांसाठीही तो अत्यंत सोयीचा व महत्त्वाचा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
यासोबतच सर्व रेल्वे प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी प्रलंबित जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करणे, पुरेसा निधी उपलब्ध करून देणे, प्रत्येक प्रकल्पासाठी स्पष्ट कालमर्यादा ठरवून नियमित उच्चस्तरीय आढावा घेणे, अशा ठोस मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंतरराज्य रेल्वे मार्गांसाठी संबंधित राज्यांमध्ये प्रभावी समन्वय वाढवण्याची गरजही त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाल्यास गडचिरोली जिल्ह्याचा केवळ दळणवळणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर सामाजिक व आर्थिक पातळीवरही सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी व्यक्त केला.
विद्यार्थी, रुग्ण, कामगार व व्यापाऱ्यांना सध्या सहन करावा लागणारा वेळ, खर्च व प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊन जिल्ह्याला विकासाची नवी दिशा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेला आता या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा असून, केंद्र सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
