Saturday, June 6, 2026
HomeChamorshiमुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची ऐतिहासिक मार्कंडा मंदिरास भेट; विकासकामांची पाहणी...

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची ऐतिहासिक मार्कंडा मंदिरास भेट; विकासकामांची पाहणी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली/चामोर्शी,२१ जानेवारी२०२६::- राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज चामोर्शी तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मार्कंडा मंदिरास भेट देऊन तेथे सुरू असलेल्या जिर्णोद्धार तसेच विविध विकासकामांची पाहणी केली. मंदिराच्या ऐतिहासिक वारशाला साजेशा पद्धतीने, दर्जेदार व कालबद्ध रीतीने ही कामे पूर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिल्या.

मुख्य सचिवांनी मंदिराच्या जिर्णोद्धारासह परिसरातील घाट, वाहनतळ, उद्यान (बगीचा), स्वच्छतागृह तसेच अंतर्गत व बाह्य सौंदर्यीकरणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या कामांदरम्यान येणाऱ्या अडचणी, तांत्रिक बाबी तसेच पुढील टप्प्यातील नियोजन याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी विभागीय आयुक्त तथा प्रधान सचिव विजयालक्ष्मी बिदरी, पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक नंदिनी साहू, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, पुरातत्त्व अधिक्षण अरूण मलिक, तसेच सहायक जिल्हाधिकारी एम. अरूण प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ चे अधीक्षक अभियंता समय निकोसे यांनी सादरीकरणाद्वारे मंदिराच्या बाह्य परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. मंदिर परिसरातील सौंदर्यीकरणाचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून, रस्ता, वाहनतळ व स्वच्छतागृहांची कामे सध्या प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्या टप्प्यात नदीघाटाचे प्रवेशद्वार तसेच इतर पूरक विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक नंदिनी साहू यांनी मंदिराच्या दुरुस्ती व जतन विषयक कामांची माहिती दिली, तर अभ्यासक शिवाली शर्मा यांनी मार्कंडा मंदिराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व वास्तुशास्त्रीय महत्त्वाबाबत सविस्तर माहिती दिली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular