VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची मडावी कुटुंबीयांची भेट; वनविभागाला तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश,
धानोरा, 31 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुळमेर येथील शेतकरी शांतराम मडावी यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतातील धानपिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मडावी यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. या दुर्दैवी घटनेने एका कुटुंबाचा आधार हिरावला असून शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तुळमेर येथे जाऊन मृत शेतकरी शांतराम मडावी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. या दुःखद प्रसंगी आपण कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यानंतर आमदार नरोटे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधून परिसरातील परिस्थिती जाणून घेतली. गेल्या काही दिवसांपासून वाघाच्या हालचाली आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. धानपीक काढणीचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना शेतात जाणेही धोकादायक ठरत आहे. कष्टाने उभे केलेले पीक वाचवायचे की स्वतःचा जीव सुरक्षित ठेवायचा, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात :-
यावेळी उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ठामपणे मांडला. वाघाच्या हालचाली असलेल्या परिसरात वनविभागाने नियमित गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवावे, गावकऱ्यांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना द्याव्यात तसेच नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकरी हा आपल्या कष्टाने अन्नधान्य पिकवणारा घटक आहे. मात्र, शेतात काम करण्यासाठी जातानाही त्याला जीव मुठीत धरावा लागत असेल, तर ही अत्यंत चिंतेची बाब आहे. वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाने केवळ घटनांनंतर धावपळ न करता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे गरजेचे आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत आणि शेतकरी व ग्रामस्थांना सुरक्षित वातावरणात जीवन जगता यावे, यासाठी वनविभागाने तातडीने प्रभावी कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार डॉ. नरोटे यांनी मांडली.
यावेळी उपस्थित मान्यवर :-
याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय कुमरे, भाजपा जिल्हा सचिव सारंग साळवे, भाजपा तालुका कोषाध्यक्ष सुभाष खोबरे, नगरपंचायत धानोरा गटनेते तथा नगरसेवक संजय कुंडू, नंदू शेंद्रे, दौलत वरवडे, रतन विश्वास, हरिश माकडे, शुभम बालेकरमकर, यश कोंडावार, सतीश पेंदोरकर, तहसीलदार गणेश माळी, वनपरिक्षेत्र अधिकारी नामदेव बनसोड, तलाठी ज्योती ठेंगरी, तलाठी दिनेश पदा तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा झालेला मृत्यू ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
