Saturday, May 23, 2026
HomeGadchiroli"विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर : हत्तीरोग गोळ्यांचा परिणाम नाही...

“विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर : हत्तीरोग गोळ्यांचा परिणाम नाही…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

आरोग्य विभागाचे ६८५ नागरिकांचे सर्वेक्षण”,

मुरखळा माल गावांत आरोग्य पथकांकडून उपाययोजना,

गडचिरोली ,०७ मार्च २०२६::- चामोर्शी तालुक्यातील आणि लखमापूर बोरी येथील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीच्या संदर्भात जिल्हा आरोग्य विभाग अत्यंत सतर्क असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी विविध आरोग्य उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथके बाधित क्षेत्रात तळ ठोकून असून घराघरांत जाऊन तपासणी केली जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी :- 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी स्वतः बाधित गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, त्यांनी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे जाऊन उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि वैद्यकीय सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी डॉ. नयना धूपारे सहायक संचालक (हिवताप) नागपूर, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी (DRCHO) डॉ. माधव शिंदे,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ सुजिता वाडीवे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम आणि यांनीही गावाला व रुग्णालयाला भेट देऊन तांत्रिक मार्गदर्शन केले.

आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या मुख्य प्रतिबंधात्मक उपाययोजना पुढील :- 

१. जलद तापरुग्ण सर्वेक्षण (Rapid Fever Survey) :- 

गावातील प्रत्येक घरात जाऊन तापाचे रुग्ण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. सर्वेक्षणादरम्यान विद्यार्थ्यांसह इतर ग्रामस्थांच्या आरोग्याचीही विचारपूस केली जात आहे.

२. गृहभेटी आणि समुपदेशन :- 

एकूण 6 आरोग्य पथके प्रत्यक्ष गृहभेटी देऊन पालकांमधील भीती दूर करत आहेत. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पथकाद्वारे केले जात असून आरोग्य शिक्षण दिले जात आहे.

३. रक्त व पाणी नमुने तपासणी :- 

 तपासणीसाठी रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले आहेत,डेंग्यू व हिवताप निगेटिव्ह आले आहेत.तसेच दूषित पाण्यामुळे संसर्ग पसरू नये यासाठी गावातील जलस्त्रोतांची OT टेस्ट (Orthotolidine Test) करण्यात येत आहे. गावातील पाण्याचे 20 नमुने अधिक सखोल तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

४. २४ तास संनियंत्रण :- 

बाधित क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तैनात असून, तेथील परिस्थितीवर जिल्हा स्तरावरून लक्ष ठेवले जात आहे.

आरोग्य शिक्षणाद्वारे जनजागृतीवर भर :- 

आरोग्य विभागातर्फे मुरखळा माल आणि परिसरात केवळ औषधोपचारच नव्हे, तर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य पथकातील कर्मचारी गृहभेटी देऊन ग्रामस्थांना बदलत्या हवामानामुळे होणारे आजार आणि डासांपासून होणाऱ्या हिवतापासारख्या आजारांची माहिती देत आहेत. पाणी साठवून ठेवण्याची ठिकाणे स्वच्छ ठेवणे, पाण्याची भांडी कोरडी करणे आणि डासोत्पत्ती रोखण्यासाठी गप्पी माशांचे महत्त्व यावर भर दिला जात आहे. तसेच, पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता ताप आल्यास त्वरित आरोग्य केंद्रात उपचार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत ९३६ घरांचे सर्वेक्षण करून वैयक्तिक स्तरावर आरोग्य संवाद साधण्यात आला आहे.  

आतापर्यंत गावातील ९३६ घरांना भेटी देऊन एकूण ६८५ नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तापाचे रुग्ण शोधण्यासाठी राबविण्यात आलेल्या जलद ताप सर्वेक्षणातून एकूण २९ रक्तनमुने गोळा करण्यात आले असून, त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जात आहे. कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंटेनर सर्वेक्षण राबवून १६०१ पाण्याचे साठे तपासण्यात आले, ज्यापैकी ९९ साठ्यांमध्ये टेमिफॉसचा वापर करण्यात आला. तसेच, डासोत्पत्ती रोखण्यासाठी गावातील कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या अशा एकूण ८ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. 

प्रशासनाचे आवाहन :- 

“विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून घाबरण्याचे कारण नाही. आरोग्य विभाग सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी आणि काही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा,” असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

  (डॉ प्रताप शिंदे )जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा परिषद, गडचिरोली

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular