Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliसर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प – महेंद्र ब्राह्मणवाडे...

सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प – महेंद्र ब्राह्मणवाडे…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, ०७ मार्च २०२६::- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असला, तरी हा अर्थसंकल्प गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करणारा असल्याची टीका गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन सुमारे ७० हजार रोजगार निर्माण होणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र यापूर्वीही सुजागड व कोणसरी प्रकल्प सुरू करताना स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात या प्रकल्पांमधून जिल्ह्यातील किती युवकांना रोजगार मिळाला, याची स्पष्ट माहिती आजपर्यंत शासनाने दिलेली नाही. त्यामुळे रोजगाराच्या नावाखाली केवळ आश्वासनांचा पाऊस पाडून जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप ब्राह्मणवाडे यांनी केला.

गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक वनसंपत्तीने समृद्ध असताना विविध प्रकल्पांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात आहे. दुसरीकडे जिल्ह्यात पाच कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही पर्यावरण संवर्धनाची योजना नसून केवळ निधी खर्च करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यासाठी तयार करण्यात आलेली योजना असल्याची टीका त्यांनी केली.

जिल्ह्यातील गावांना गावांशी जोडणाऱ्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब स्थितीत असून नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून उद्योगपती मित्रांना फायदा करून देण्यासाठी ‘खनिज महामार्ग’ विकसित करण्याचा निर्णय घेतला जात आहे, हे दुर्दैवी असल्याचेही ब्राह्मणवाडे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या असल्या, तरी प्रत्यक्षात स्थानिक शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प विकासाचा नसून केवळ घोषणांचा आणि जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प असल्याचे मत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular