Saturday, August 1, 2026
HomeGadchiroliयुवकांनी काळानुरूप शिक्षण व कौशल्य संपादन करावे : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल...

युवकांनी काळानुरूप शिक्षण व कौशल्य संपादन करावे : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत 1278 युवकांना रोजगार; नियुक्तीपत्र वितरण व 31 वाहनांचे लोकार्पण,

गडचिरोली ,१८ एफ्रिल २०२६::-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.

 गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत आयोजित भव्य रोजगार मेळावा व वाहन लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार डॉ मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू आलम सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात युवकांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच माओवाद विरोधी अभियानासाठी प्राप्त 31 चारचाकी वाहनांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

सदर रोजगार मेळाव्यात देशातील 38 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. दुर्गम व अतिदुर्गम भागातील 4 हजारांहून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली असून सुमारे 2400 उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहिले. त्यापैकी एकूण 1278 युवकांना विविध कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक सुमारे 1 लाख 80 हजार ते 3 लाख 60 हजार रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.

 

यावेळी मार्गदर्शन करताना सहपालकमंत्री जयस्वाल म्हणाले की, केवळ शिक्षण पुरेसे नसून कौशल्याधारित शिक्षणाची जोड आवश्यक आहे. बदलत्या स्पर्धात्मक युगात युवकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून उपलब्ध संधींचा स्वीकार करावा. स्वतःचा विकास साधताना जिल्ह्याच्या प्रगतीतही योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला गती मिळत आहे. विविध उद्योग, खनिज संपत्ती आणि विकास प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी वाढत असून यामुळे जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

आमदार मिलिंद नरोटे यांनी रोजगार मेळाव्याच्या आयोजनाबद्दल पोलीस विभागाचे अभिनंदन करत शासन युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

गडचिरोली पोलीस दलाने माओवाद नियंत्रणासोबतच युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगार व कौशल्य विकासाचे उपक्रम राबविले असून या रोजगार मेळाव्यामुळे दुर्गम भागातील युवकांना नवी दिशा मिळणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाला बहुसंख्य उमेदवार, पालक व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular