Saturday, August 1, 2026
HomeGadchiroliखत विक्रीतील गैरप्रकार प्रकरणी देसाईगंज येथे कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा...

खत विक्रीतील गैरप्रकार प्रकरणी देसाईगंज येथे कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

अनुदानित खताचा काळाबाजार, ई-पॉस प्रणालीत फेरफार,

गडचिरोली ,१८ एफ्रिल २०२६::- शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत (DAP) अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे, खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस (e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे. नाकाडे कृषी केंद्र चे संचालक भास्कर महादेव नाकाडे यांच्याविरुद्ध देसाईगंज पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी दिली आहे.

कृषी विभाग गडचिरोलीच्या जिल्हा भरारी पथकाने व तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांनी दिनांक ८ ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान संबंधित कृषी केंद्राची संयुक्त तपासणी केली. या तपासणीत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, शेतकऱ्यांच्या नावे ई-पॉस मशीनवर सुमारे १.५ मेट्रिक टन डीएपी खत विक्री दाखवण्यात आली असली तरी संबंधित शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात इतक्या प्रमाणात खत घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. यावरून बोगस विक्रीचे प्रकार उघड झाले आहेत.

तसेच आय.एफ.एम.एस. (iFMS) पोर्टलवरील नोंदींच्या पडताळणीत सुमारे २५ मेट्रिक टन अनुदानित खताची विक्री जिल्ह्याबाहेर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याशिवाय दुकानातील साठा नोंदवही (एन फॉर्म) अद्ययावत नसणे, प्रत्यक्ष साठा व नोंदींमध्ये मोठी तफावत आढळणे आणि शेतकऱ्यांना पक्की बिले न देणे असे गंभीर प्रकारही तपासणीत समोर आले.

या प्रकरणी कृषी विभागाने दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी संबंधित संचालकास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र सादर केलेला खुलासा असमाधानकारक ठरल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खत निरीक्षक श्रीमती शितल खोबरागडे यांनी देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच खत (नियंत्रण) आदेश, १९८५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांना स्पष्ट इशारा देत खत विक्रीमध्ये पारदर्शकता राखण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काच्या खताचा काळाबाजार किंवा ई-पॉस प्रणालीत कोणत्याही प्रकारची छेडछाड आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular