Wednesday, July 29, 2026
HomeGadchiroli‘ज्ञानभारतम्’ योजनेअंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण सुरू...

‘ज्ञानभारतम्’ योजनेअंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण सुरू…

VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,

नागरिकांनी सहभाग नोंदवावा,

‘Gyan Bharatam’ ॲपद्वारे नोंदणीची सुविधा; देवस्थान, संस्था व नागरिकांना आवाहन,

गडचिरोली ,०६ मे २०२६::- भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने देशातील अमूल्य सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ (Gyan Bharatam) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून, प्राचीन हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याचा व्यापक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणाचा अधिकृतपणे प्रारंभ १६ मार्च २०२६ पासून देशभरात करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील देवस्थान मंडळे, धार्मिक संस्था तसेच खाजगी व्यक्ती यांच्याकडे १९५० पूर्वीचे हस्तलिखित ग्रंथ, पोथ्या, लेख किंवा अन्य ऐतिहासिक साहित्य उपलब्ध असल्यास त्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. अशा मौल्यवान वारशाची नोंद शासनाकडे करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

या उपक्रमांतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये तसेच खाजगी संग्राहक यांच्याकडे असलेल्या विविध भाषांतील, सांस्कृतिक, ऐतिहासिक व पौराणिक महत्त्वाच्या हस्तलिखितांचे संकलन व जतन करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या माध्यमातून देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संवर्धन होणार आहे.

नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होणे सुलभ व्हावे यासाठी गुगल प्ले स्टोअरवर ‘Gyan Bharatam’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपद्वारे कोणत्याही भाषेतील हस्तलिखित, सांस्कृतिक, ऐतिहासिक किंवा पौराणिक ग्रंथांची माहिती सहजपणे अपलोड करता येणार आहे. नागरिकांनी हे ॲप डाउनलोड करून आपल्या हस्तलिखितांची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व राज्य विद्यापीठे, महाविद्यालये, ग्रंथालये व विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनीही या सर्वेक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular