VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
दोन वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा नादुरुस्त,
आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार,
उच्चस्तरीय चौकशीची मागणी,
गडचिरोली ,२३ जुन २०२६::- आदिवासीबहुल आणि दुर्गम भागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवा ही नागरिकांसाठी जीवनरेखा मानली जाते. गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त नागरिक, गर्भवती माता तसेच आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, रुग्णांना जीवनदान देण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या याच रुग्णवाहिका गेल्या तब्बल दोन वर्षांपासून चंद्रपूर येथील फोर्स कंपनीच्या वर्कशॉपमध्ये दुरुस्तीच्या नावाखाली खितपत पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित वर्कशॉपच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखालील या रुग्णवाहिका नियमित सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीसाठी चंद्रपूर येथील फोर्स कंपनीच्या अधिकृत वर्कशॉपमध्ये पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, काही दिवसांत पूर्ण होणारे काम दोन वर्षांनंतरही पूर्ण झाले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रुग्णांची सेवा करणाऱ्या रुग्णवाहिकाच पडल्या आजारी :-
शासनाने ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना तातडीची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. मात्र आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की रुग्णांना ऑक्सिजन देणाऱ्या आणि जीवदान देणाऱ्या रुग्णवाहिकाच स्वतः ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत असल्याची उपरोधिक चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील वर्कशॉपमध्ये दुरुस्तीसाठी पाठविण्यात आलेल्या काही रुग्णवाहिकांचे महत्त्वाचे यांत्रिक भाग गायब असल्याचे सांगितले जात आहे. काही वाहनांमधील ECU (इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट) बदलण्यात आल्याचा आरोप आहे, तर काही वाहनांतील इतर महत्त्वाचे सुटे भागही बदलण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. एवढेच नव्हे तर नवीन मॉडेलच्या रुग्णवाहिकांमध्ये जुन्या मॉडेलचे भाग बसविण्यात आल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या आरोपांची सत्यता चौकशीतून समोर येणे आवश्यक आहे.
दोन वर्षे दुरुस्तीच सुरू आहे का ;-?
सामान्य सर्व्हिसिंग आणि किरकोळ दुरुस्तीसाठी पाठविलेल्या रुग्णवाहिका दोन-दोन वर्षे वर्कशॉपमध्ये का ठेवण्यात आल्या? दुरुस्तीच्या प्रक्रियेला इतका विलंब का झाला? या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांनी कोणता पाठपुरावा केला? वाहनांच्या स्थितीचा नियमित आढावा घेण्यात आला का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, या पाच रुग्णवाहिका सेवेतून बाहेर गेल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांवर त्याचा परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक दुर्गम भागांमध्ये रुग्णांना वेळेत उपचारासाठी हलविणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सेवा अभियंत्याला धमकी दिल्याचा आरोप ;-
या प्रकरणाला आणखी गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. माहितीप्रमाणे, आरोग्य विभागाच्या एका सेवा अभियंत्याने रुग्णवाहिकांच्या दुरुस्तीतील विलंबाबाबत माहिती घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी संबंधित वर्कशॉपला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना कथितरित्या नोकरी गमावण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
संबंधित अभियंत्याने माध्यमांसमोर या घटनेबाबत आपली भूमिका मांडल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही औपचारिक पोलिस तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणामागील सत्य काय, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
रुग्ण आणि गर्भवती महिलांना सर्वाधिक फटका ;-
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आरोग्य सुविधा मर्यादित आहेत. अनेक वेळा गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती किंवा गर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकेवरच अवलंबून राहावे लागते.
अशा परिस्थितीत पाच रुग्णवाहिका दीर्घकाळ सेवाबाह्य राहिल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होत असल्याचे बोलले जात आहे. शासनाने उपलब्ध करून दिलेली साधने वापराअभावी वर्कशॉपमध्ये धूळ खात पडून राहणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे.
फोर्स वर्कशॉप आणि आरोग्य विभागावर संशयाची सुई ;-
रुग्णवाहिका दुरुस्तीच्या नावाखाली दोन वर्षे वर्कशॉपमध्ये ठेवण्यात आल्याने संबंधित फोर्स वर्कशॉपच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. वाहनांमधील सुटे भाग बदलल्याच्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. आरोग्य विभागाने या संपूर्ण कालावधीत नेमकी कोणती भूमिका घेतली, याचाही तपास होणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.
नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की, जर एखाद्या सामान्य नागरिकाचे वाहन इतक्या काळ वर्कशॉपमध्ये राहिले असते, तर त्याने कायदेशीर मार्ग अवलंबला असता. मग शासनाच्या मालकीच्या आणि जनतेच्या सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकांच्या बाबतीत प्रशासन इतके निष्क्रिय का राहिले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता विविध स्तरांतून होत आहे. नागरिक, सामाजिक संघटना आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांनी खालील मुद्द्यांवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
– पाच रुग्णवाहिका दोन वर्षांपासून वर्कशॉपमध्ये का पडून आहेत?
– दुरुस्तीमध्ये असामान्य विलंब का झाला?
– वाहनांतील सुटे भाग बदलण्यात आले का?
– संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणती जबाबदारी पार पाडली?
– शासनाच्या मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास त्यासाठी जबाबदार कोण?
– सेवा अभियंत्याला धमकी दिल्याच्या आरोपांची सत्यता काय?
मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवेशी संबंधित अशा गंभीर बाबी समोर येत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. रुग्णांच्या जीवाशी संबंधित सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा किंवा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
