Tuesday, July 28, 2026
HomeChamorshi७ दिवसांत चामोर्शी तालुक्यातील नविन बसस्थानक सुरू करा - जिल्हा प्रमुख पवन...

७ दिवसांत चामोर्शी तालुक्यातील नविन बसस्थानक सुरू करा – जिल्हा प्रमुख पवन गेडाम (उबाठा गट)…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

अन्यथा चक्काजाम आंदोलनाचा इशारा,

गडचिरोली/चामोर्शी,०४ जुलै २०२६::- चामोर्शी तालुक्याच्या मुख्यालयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) नवीन बसस्थानक सर्व सुविधा व आवश्यक बांधकामासह पूर्णत्वास येऊन तब्बल दोन महिने उलटले आहेत. बसस्थानक सुरू करण्यासाठी कोणताही तांत्रिक अडथळा नसताना केवळ स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे हे बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडले आहे.

आजही सर्वसामान्य प्रवाशांना भर उन्हाळ्यात कडक उन्हात, तर सध्या मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला तासनतास एसटीची वाट पाहावी लागत आहे. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जनतेच्या पैशातून उभारलेले बसस्थानक जनतेच्या उपयोगात येत नसणे, ही प्रशासनाची निष्क्रियता आणि लोकप्रतिनिधींचे जनतेप्रती असलेले उदासीन धोरण उघड करणारी बाब आहे.

जनतेच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेत स्थानिक नागरिकांनी शिवसेना (उबाठा गट ) गडचिरोली जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यानंतर पवन गेडाम यांनी स्वतः चामोर्शी येथे जाऊन स्थानिक नागरिक व प्रवाशांसमवेत नवीन बसस्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान बसस्थानक पूर्णपणे तयार असूनही केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट झाले.

यावेळी जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी प्रशासन व स्थानिक आमदारांवर जोरदार टीका करत स्पष्ट इशारा दिला की, “जनतेच्या सुविधांवर राजकारण करणे बंद करा. जर स्थानिक आमदारांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसेल, तर येत्या सात दिवसांत शिवसेना आपल्या पदाधिकारी, शिवसैनिक आणि जनतेला सोबत घेऊन या बसस्थानकाचे लोकार्पण करेल. त्यानंतर एकही एसटी बस जुन्या ठिकाणी रस्त्यावर उभी राहू दिली जाणार नाही. गरज पडल्यास चक्काजाम आंदोलन करून जनतेचा हक्क जनतेलाच मिळवून दिला जाईल.”

जनतेच्या प्रश्नांबाबत गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाने आणि सत्तेच्या मस्तीत जनतेला विसरलेल्या लोकप्रतिनिधींनी आता तरी जागे व्हावे. विकासकामांचे फक्त भूमिपूजन आणि उद्घाटनाचे राजकारण न करता ती कामे तातडीने जनतेच्या सेवेत उपलब्ध करून द्यावीत. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींवर राहील.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular