VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली / चामोर्शी, 10 सप्टेंबर 2026::- चामोर्शी शहरातील बालगोपालांना आपल्या सांस्कृतिक परंपरेची ओळख व्हावी तसेच पारंपरिक सण-उत्सवांचे जतन व्हावे, या उद्देशाने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता आठवडी बाजार चौक, नगरपंचायत कार्यालयासमोर भव्य ‘तान्हापोळा उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात बालगोपालांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ‘चामोर्शी तालुक्यातील प्रथम चामोर्शी रत्न पुरस्कार’ हे राहणार आहे. त्यासोबतच बालकांसाठी वयोगटानुसार दोन विविध थीमवर आकर्षक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसांसह सहभागी प्रत्येक बालकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.
१ ते ६ वर्षे वयोगटासाठी ‘गडचिरोली जिल्ह्यातील संस्कृती’ ही थीम ठेवण्यात आली आहे. या गटात प्रथम क्रमांकासाठी ₹६,००१, द्वितीय क्रमांकासाठी ₹५,००१ आणि तृतीय क्रमांकासाठी ₹२,५०१ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम बक्षीस किशोर ओल्लालवार, द्वितीय बक्षीस सोनाली पिपरे आणि तृतीय बक्षीस शुभम एंटरप्रायजेस, चामोर्शी यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
तर ७ ते १४ वर्षे वयोगटासाठी ‘रस्ते सुरक्षा’ ही थीम निश्चित करण्यात आली आहे. या गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ₹७,००१, द्वितीय क्रमांकास ₹५,००१ आणि तृतीय क्रमांकास ₹३,००१ चे बक्षीस देण्यात येणार आहे. ही बक्षिसे अनुक्रमे रितेश पालारपवार, कविश्वरराव आईंचवार आणि सूरज प्रकाश शिवनीवार यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, प्रत्येक बाल स्पर्धकाला राजा गोपिचंद किराणा यांच्या वतीने आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून, स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
या तान्हापोळा उत्सवाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार, नगरसेविका प्रेमाताई आईंचवार, रमेश अधिकारी, यशवंत त्रिकोडे आणि माधवी पेशट्टीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. चामोर्शी शहरातील नागरिकांनी आपल्या बालगोपालांना नंदीबैलासह या पारंपरिक सोहळ्यात सहभागी करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
