Friday, September 11, 2026
HomeChamorshiएनएमएमएसमध्ये वैष्णवी राऊतची जिल्ह्यात बाजी; शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव...

एनएमएमएसमध्ये वैष्णवी राऊतची जिल्ह्यात बाजी; शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते गौरव…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

शिवाजी हायस्कूल, चामोर्शीच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा; चार वर्षे मिळणार दरवर्षी १२ हजारांची शिष्यवृत्ती,

गडचिरोली /चामोर्शी, 10 सप्टेंबर 2026::- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) सत्र २०२५-२६ मध्ये शिवाजी हायस्कूल, चामोर्शी येथील गुणवंत विद्यार्थिनी कु. वैष्णवी जानकीराम राऊत हिने गडचिरोली जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे शिवाजी हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

वैष्णवीच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते तिचा भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवल्याने वैष्णवीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

NMMS परीक्षेतील यशामुळे वैष्णवीला शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार असून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये, अशी शिष्यवृत्ती तिला मिळणार आहे. गुणवत्तेसोबतच मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर मिळविलेले तिचे हे यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

वैष्णवीच्या या यशाबद्दल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, मंडळाचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य धनेंद्र चौधरी, उपप्राचार्य शाम भर्रे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी वैष्णवीचे पालक जानकीराम राऊत उपस्थित होते. आपल्या मुलीने जिल्हास्तरावर मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे पालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

वैष्णवी राऊत हिने मिळविलेला जिल्ह्यातील प्रथम क्रमांक हा तिच्या वैयक्तिक गुणवत्तेचा गौरव तर आहेच; पण त्यासोबतच शिवाजी हायस्कूल, चामोर्शीच्या दर्जेदार शैक्षणिक वाटचालीवर शिक्कामोर्तब करणारे यश ठरले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular