Tuesday, July 28, 2026
HomeChamorshiजमीन अधिग्रहणा संदर्भातील जीआर रद्द करण्याची मागणी...

जमीन अधिग्रहणा संदर्भातील जीआर रद्द करण्याची मागणी…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

शेतकऱ्यांचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांना निवेदन,

गडचिरोली/चामोर्शी,०६ जुलै २०२६::- चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर, वायगाव व येनापूर परिसरातील शेतकरी बांधवांनी जमीन अधिग्रहणासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) तातडीने रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी रविवारी, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी गडचिरोली येथे गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी शेतकरी बांधवांनी आमदारांशी सविस्तर चर्चा करत संबंधित जीआरमुळे परिसरातील सुपीक शेती धोक्यात येत असल्याची भूमिका मांडली.

शेतकरी बांधवांनी निवेदनाद्वारे राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे हा विषय तातडीने मांडून जमीन अधिग्रहणासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. तसेच चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या शेतीचे संरक्षण व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेत त्यांच्या मागणीची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी येत्या एक-दोन दिवसांत चर्चा करून हा विषय शासन स्तरावर मांडण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना दिले.

शेतकरी बांधवांनी यावेळी सांगितले की, सुपीक जमीन हीच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असून त्यावरच संपूर्ण कुटुंबाचा संसार अवलंबून आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणामुळे शेती गमावण्याची वेळ येऊ नये आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, हीच त्यांची प्रमुख अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी संदीप तिमाडे, नेमाजी घोगरे, अशित मिस्त्री, वसंत बुरमवार, सुधाकर गद्दे, बापुजी देशमुख, फुलमती मंडल, भारत वाकुडकर, सुरेश गुंतीवार, प्रकाश गौरकार यांच्यासह जैरामपूर, वायगाव व येनापूर परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular