Wednesday, October 28, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीतील 353C व 130D महामार्ग ‘मृत्यूचे कॉरिडॉर’...

गडचिरोलीतील 353C व 130D महामार्ग ‘मृत्यूचे कॉरिडॉर’…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट करा – माजी आमदार डॉ. देवराव होळी,

गडचिरोली,२१ जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C (सिरोंचा–आलापल्ली–आष्टी) तसेच 130D (आलापल्ली–भामरागड) या मार्गांवरील निकृष्ट दर्जाचे बांधकाम, संथ गतीने सुरू असलेले काम आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा भाजप आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संसद अधिवेशनादरम्यान झालेल्या या भेटीत डॉ. होळी यांनी सविस्तर निवेदन सादर करत संबंधित कंत्राटदाराचा परवाना तात्काळ रद्द करून त्याला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे, निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि संपूर्ण काम नव्याने पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे गुणवत्तापूर्ण व वेळबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी केली.

निवेदनात त्यांनी नमूद केले की, महामार्गांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे, अपूर्ण पूल, धोकादायक वळणे, पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे वारंवार भीषण अपघात होत आहेत. अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असून या मार्गांना आता नागरिकांनी ‘मृत्यूचे कॉरिडॉर’ अशी उपमा दिली आहे.

या गंभीर प्रश्नावर नागरिक, व्यापारी, वाहनचालक आणि विविध सामाजिक संघटनांनी अनेक वेळा निवेदने दिली, आंदोलने, रास्ता रोको व निषेध मोर्चे काढले. मात्र, संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार यंत्रणांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची खंतही डॉ. होळी यांनी व्यक्त केली.

यावेळी बोलताना डॉ. देवराव होळी म्हणाले, “गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यात रस्ते ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून जनतेची जीवनवाहिनी आहे. कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असतील, तर अशा कंत्राटदारांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत देता कामा नये.”

या भेटीदरम्यान SC/ST विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. नरेंद्र उंदीरवाडे, गडचिरोली जिल्हा महासचिव अमोल कुळमेथे आणि डॉ. मिलिंद रामटेके उपस्थित होते.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाकडून तातडीने अहवाल मागवून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याची माहिती माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular