Tuesday, July 28, 2026
HomeChamorshiसार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह 'रामभरोसे'...

सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह ‘रामभरोसे’…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

देखभालीअभावी दुरवस्था, संबंधित मेंटेनन्स कंत्राटदारावर कारवाईची मागणी,

गडचिरोली /चामोर्शी, २३ जुलै २०२६::- चामोर्शी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) विश्रामगृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, देखभाल व आवश्यक सुविधांच्या अभावामुळे हे विश्रामगृह अक्षरशः ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

विश्रामगृहात अनेक मूलभूत समस्या निर्माण झाल्या आहेत. येथे चौकीदार व स्वयंपाकी उपलब्ध नसल्याने विश्रामगृहाच्या व्यवस्थापनावर मोठा परिणाम झाला आहे. अधिकारी, कर्मचारी तसेच येथे मुक्कामासाठी येणाऱ्या पाहुण्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

विश्रामगृहाच्या इमारतीवर मोठ्या प्रमाणात झाडे उगवली असून त्यामुळे इमारतीच्या संरचनेला धोका निर्माण झाला आहे. तसेच स्वच्छतागृहाचा पाईप फुटल्याने परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरत आहे. याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

याशिवाय खिडक्यांच्या स्लॅबचे पोपडे निघून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. त्यामुळे इमारतीची सुरक्षितता धोक्यात आली असून कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेत दुरुस्ती न झाल्यास इमारतीचे आणखी मोठे नुकसान होऊ शकते.

स्थानिक नागरिकांच्या मते, शासनाकडून सार्वजनिक इमारतींच्या देखभालीसाठी नियमित निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, त्या निधीचा योग्य वापर होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची अशी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या विश्रामगृहाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, चौकीदार व स्वयंपाकी यांची त्वरित नियुक्ती करावी, परिसराची स्वच्छता करून इमारत सुरक्षित करावी, अशी मागणी केली आहे.

तसेच, विश्रामगृहाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या संबंधित मेंटेनन्स कंत्राटदाराची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास त्याच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, तसेच देखभालीसाठी मंजूर झालेल्या निधीचा वापर, कामांची गुणवत्ता आणि जबाबदारी यांचीही चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन विश्रामगृहाची दुरवस्था दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular