Tuesday, July 28, 2026
HomeChamorshiदोन वर्षांपासून रखडलेले चामोर्शीचे क्रीडांगण...

दोन वर्षांपासून रखडलेले चामोर्शीचे क्रीडांगण…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

 यंदा तरी पूर्णत्वास जाणार का? जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष निकेश गड्डेवार,

गडचिरोली/चामोर्शी,१८ जुलै २०२६::- चामोर्शी शहरात जिल्हा क्रीडा विभागामार्फत उभारण्यात येत असलेल्या क्रीडांगणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असले, तरी आजतागायत ते पूर्णत्वास पोहोचलेले नाही. त्यामुळे शहरातील खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दररोज शेकडो युवक-युवती, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्यदायी जीवनासाठी या मैदानावर धावणे, व्यायाम आणि विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी येतात. मात्र, क्रीडांगणातील अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपूर्ण असून मैदानात मोठ्या प्रमाणात गवत व झुडपे वाढल्याने परिसराची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार लेखी व तोंडी निवेदने देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. संबंधित कंत्राटदाराकडून कामाचा वेग वाढविण्याऐवजी सातत्याने विलंब होत असल्याने शासनाच्या विकासकामांच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष निकेश भाऊ गद्देवार यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संबंधित कंत्राटदारास प्रलंबित सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, तसेच मैदानाची स्वच्छता करून व्यायाम व सरावासाठी येणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.

चामोर्शीसारख्या मोठ्या तालुक्यातील महत्त्वाचे क्रीडांगण दोन वर्षांपासून अपूर्ण राहिल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आता “यंदा तरी चामोर्शीचे क्रीडांगण पूर्ण होणार का?” असा सवाल नागरिक, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उपस्थित केला जात असून, जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular