VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’चा जिल्हास्तरीय आढावा; दोन लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन,
गडचिरोली,२२ जुलै २०२६::- ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कोणत्याही विलंबाशिवाय मिळावा, यासाठी फार्मर आयडी (Farmer ID), आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक (Agristack) नोंदणी अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांनी तातडीने आपले सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा संबंधित केंद्रावर जाऊन नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली असून, योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, तर नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार बँकांकडून प्राप्त कर्जमाहितीच्या आधारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित पीक कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळू शकतो. आवश्यकतेनुसार पात्र लाभार्थ्यांसाठी एकरकमी समझोता (OTS) योजनेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय सन २०२३-२४ किंवा २०२४-२५ या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्जाची नियमानुसार पूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भरलेल्या रकमेच्या आधारे कमाल ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद शासनाने केली आहे.
कर्जमाफी प्रक्रियेत उद्भवणाऱ्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती कार्यरत राहणार असून, पात्र शेतकऱ्यांच्या तक्रारींचे नियमानुसार निवारण करण्यात येईल.
दरम्यान, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँक शाखा, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, तहसील कार्यालय तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मुकुंद मेश्राम यांनी दिली.
फार्मर आयडी नोंदणी वेळेत पूर्ण करून शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना केले आहे.
