VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /चामोर्शी,२४ जुलै २९२६::- चामोर्शी पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी कारवाई करत दोन बैलांची सुटका केली असून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले पिकअप वाहनही जप्त करण्यात आले असून एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास मौजा हरनघाट नाका परिसरात मुखबिराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. मैडाळा गावाकडून हरनघाट नाक्याकडे येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH-40-CD-5192) या वाहनाला पोलिसांनी अडवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनामध्ये दोन गोवंशीय बैलांना अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून, त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, तसेच पाय दोरखंडाने बांधून निर्दयीपणे वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. जनावरांना पुरेशी जागा नसताना त्यांना कथितपणे कत्तलीच्या उद्देशाने नेले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी नितेश सुरेश बुरांडे (वय २२, रा. कुनघाडा (रे.), ता. चामोर्शी) व रोशन जगन्नाय चलाख (वय १९, रा. कुरुड, ता. चामोर्शी) या दोघांविरुद्ध प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पशुहत्याबंदी सुधारणा अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान सुमारे ₹१०,००० किंमतीचा एक लाल रंगाचा बैल, ₹१०,००० किंमतीचा एक पांढऱ्या-धामणा रंगाचा बैल आणि अंदाजे ₹२ लाख किंमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ₹२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस शिपाई अतुल भगवान मडावी यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक गणेश पी. जंगले हे पुढील तपास करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलिसांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
