VAINGANGA NEWS 24 /विशेष प्रतिनिधी,
शेकडो नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ,
गडचिरोली,२४ जुलै २०२६::- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव येथे दि. २३ जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ऋषीकांत पापडकर, कुणाल चिलगेलवार, पंडित पाटील मेश्राम (पोलीस पाटील, मारकबोडी), पंकज राऊत (पोलीस पाटील, डोंगरगाव), रुपेश चौधरी (ग्रामपंचायत सदस्य, डोंगरगाव), डॉ. रामटेके, डॉ. भागवत, फहीम काजी, कपिल बागडे, विजय धाकटे, जीवनदास देशमुख, मुकुंदा बावणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टरांचे पथक आणि परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात विविध आजारांची मोफत तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला, आवश्यक औषधांचे मोफत वितरण तसेच जीवनशैलीशी संबंधित आजारांबाबत जनजागृती करण्यात आली. ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच खरी लोकसेवा असल्याचे सांगितले. “राजकारणाबरोबरच समाजकारणाला प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून स्वागत केले. उपस्थितांनी अशा आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय अधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक उत्तरदायित्व जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम डोंगरगाव परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
