VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
कोट्यवधींच्या योजनेवर प्रश्नचिन्ह; शुद्धीकरण यंत्रणा निष्प्रभ,
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात,
गडचिरोली/चामोर्शी,२६ जुलै २०२६::- केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मिशन’ योजनेअंतर्गत लखमापूर बोरी येथे उभारण्यात आलेली पाणीपुरवठा व शुद्धीकरण व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून गावातील अनेक घरांमध्ये नळाद्वारे गढूळ, गाळयुक्त व अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गावात कोट्यवधी रुपये खर्चून जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या नळातून पिण्यायोग्य पाण्याऐवजी गढूळ पाणी येत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. काही भागांत पाण्याचा रंग बदललेला असून त्यात मोठ्या प्रमाणात गाळ आढळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“हे पाणी प्यायचे की फेकून द्यायचे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ प्रशासनाला विचारत आहेत. नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा न होत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत असून त्यांचा आर्थिक व मानसिक त्रास वाढला आहे.
पावसाळ्यात अशा दूषित पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, कावीळ यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाणी नमुन्यांची तपासणी करून शुद्धीकरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी एन. कुळसंगे यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नियमित स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. तसेच जलशुद्धीकरण टाकीच्या स्वच्छतेसाठी सहायक व्यक्तीस मानधन दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, पाणीपुरवठा कर्मचारी रमेश बोरीकर यांनी यंत्रणेतील अनेक अडचणी समोर आणल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार महिन्यांपासून केवळ ५० टक्के वेतन मिळत असून तेही वेळेवर मिळत नाही. जलशुद्धीकरण टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ साचतो, हेल्पर उपलब्ध नाही, डोजिंग मशीनमध्ये बिघाड आहे आणि गावाच्या गरजेनुसार दोन कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना संपूर्ण जबाबदारी एकट्यालाच पार पाडावी लागत आहे. परिणामी शुद्धीकरण प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही गावकऱ्यांना आजही स्वच्छ पाणी का मिळत नाही? जल जीवन मिशनची यंत्रणा नेमकी कुठे अपयशी ठरली? याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी तसेच नियमित, शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी लखमापूर बोरी येथील नागरिकांकडून होत आहे.
