VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
दोन आरोपी गजाआड,
गडचिरोली,२६ जुलै २०२६::- पोस्टे पिपली बुर्गी हद्दीत माओवादी असल्याचे भासवून बॅनर व पत्रके लावून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, जिल्हा पोलिसांच्या तत्पर तपासाची प्रशंसा होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ जुलै २०२६ रोजी पिपली बुर्गी येथून जिजावंडी टोलाकडे जाणाऱ्या मार्गावरील दिशादर्शक फलकाजवळ लाल रंगाचे कापडी बॅनर तसेच पांढऱ्या रंगाचे पत्रक आढळून आले होते. या बॅनर व पत्रकांवरील मजकूर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने लिहिल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि विविध तपास पद्धतींचा वापर करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेत अखेर दोघांना अटक केली.
या प्रकरणी दि. १४ जुलै २०२६ रोजी पिपली बुर्गी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमे तसेच बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे अफवा पसरवून किंवा माओवादी नावाचा गैरवापर करून समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
