VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे – पंकजभाऊ पेशट्टीवार,
गडचिरोली/चामोर्शी,२६ जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील DNT/NT/SNT समाजाच्या शैक्षणिक हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी संघटित होण्याची गरज आहे, असे आवाहन कापेवार-बेलदार समाज संघटना, चामोर्शीचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते पंकजभाऊ पेशट्टीवार यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या आदिवासी विकास मंत्रालयाने सन २०१८ मध्ये एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये DNT/NT/SNT समाजासाठी ५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अलीकडे गडचिरोलीचे माजी आमदार देवराव होळी यांनी हा ५ टक्के कोटा रद्द करून सर्व जागा आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील DNT/NT/SNT समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना पंकजभाऊ पेशट्टीवार म्हणाले की, DNT/NT/SNT समाज देखील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे. शासनाने दिलेल्या ५ टक्के आरक्षणामुळे अनेक गरीब व वंचित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मोफत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. हा कोटा रद्द झाल्यास जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होईल आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.
ते पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील NT-A, NT-B, NT-C, NT-D तसेच DNT समाजातील सर्व बांधवांनी जाती-पातीचे भेद बाजूला ठेवून एकत्र यावे. समाजाच्या शैक्षणिक अधिकारांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे निवेदन सादर करून २०१८ चा केंद्र सरकारचा आदेश कायम ठेवण्याची मागणी करण्यात यावी.
पंकजभाऊ पेशट्टीवार यांनी स्पष्ट केले की, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नवीन एकलव्य निवासी शाळा सुरू करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, त्यासाठी DNT/NT/SNT समाजाला मिळालेला ५ टक्के आरक्षणाचा हक्क कोणत्याही परिस्थितीत काढून घेऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
या आवाहनामुळे जिल्ह्यातील DNT/NT/SNT समाजबांधवांमध्ये संघटित होण्याची चळवळ अधिक वेग घेण्याची शक्यता व्यक्त होत असून, शैक्षणिक हक्कांच्या संरक्षणासाठी लवकरच सामूहिक निवेदन देण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.
