Monday, September 14, 2026
HomeBhadrawatiवनविभागातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात...

वनविभागातील दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

२० हजारांची लाच घेताना रंगेहात कारवाई,

चंद्रपूर /भद्रावती,२९ जुलै २०२६::- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती वनक्षेत्र सहाय्यक कार्यालयातील वनपाल आणि वनरक्षक यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई केली आहे. अवैध रेती वाहतूक प्रकरणातील कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने सापळा रचून दोन्ही अधिकाऱ्यांसह एका खासगी इसमाला रंगेहात ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार घरबांधणीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे रेती वाहतूक करत असताना वन विभागाने कारवाई केली होती. या कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याच्या मोबदल्यात वनपाल व वनरक्षक यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीच्या चंद्रपूर पथकाने सापळा रचला. आरोपींनी एका खासगी इसमामार्फत २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने तिघांनाही रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार व एसीबी चंद्रपूरच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular