VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
हजारो शेतकऱ्यांची जनजागृती रॅली, शासनाला इशारा,
गडचिरोली/चामोर्शी,२९ जुलै २०२६::- चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात १४ गावांतील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत मंगळवारी (२८ जुलै) भव्य जनजागृती रॅली काढली. हजारो शेतकरी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावर आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी त्यांच्या पिढ्यानपिढ्या कसलेल्या सुपीक शेतजमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत. या जमिनीच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने अधिग्रहणामुळे हजारो कुटुंबांचे भविष्य धोक्यात येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
जनजागृती रॅलीदरम्यान आंदोलनकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन शासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. “आमची जमीन, आमचा श्वास”, “जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडलेल्या या रॅलीत महिलांचा व युवकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेत, “जमीन अधिग्रहणाचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असा इशारा शासन आणि प्रशासनाला दिला. शेतकऱ्यांच्या या एकजुटीमुळे प्रशासनावर दबाव वाढल्याची चर्चा असून, या आंदोलनाची शासन कोणत्या पद्धतीने दखल घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या जनजागृती रॅलीमुळे जयरामपूर परिसरातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पुढील काळात शेतकरी आंदोलनाची दिशा आणि शासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
