Wednesday, July 29, 2026
HomeGadchiroliनक्षली पत्रके टाकणारे सहा जण अटकेत; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई...

नक्षली पत्रके टाकणारे सहा जण अटकेत; गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली,२९ जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने नक्षलवादी असल्याचा बनाव करून पत्रके व बॅनर लावणाऱ्या सहा जणांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांत अशा प्रकारातील ही दुसरी मोठी कारवाई असून, पोलिसांच्या सतर्कतेचे हे द्योतक मानले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षल सप्ताहादरम्यान भामरागड तालुक्यातील फुलणार पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत काही अज्ञात व्यक्तींनी लाल रंगाचे झेंडे, बॅनर आणि नक्षलवादी आशयाची पत्रके लावून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती आणि विशेष शोधमोहीमेच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

या तपासादरम्यान सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी नक्षलवादी असल्याचा बनाव करून नागरिकांमध्ये भीती पसरविण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील इतर संशयितांचाही शोध सुरू आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नक्षलवादी नावाखाली कोणत्याही अफवा किंवा भडकावू प्रचाराला बळी पडू नये. संशयास्पद हालचाली किंवा वस्तू आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. अशा समाजविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नक्षलविरोधी अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी गडचिरोली पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत असून, जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular