Wednesday, July 29, 2026
HomeChamorshiशुद्धीकरणाशिवाय पाण्याची कॅन विक्री? चामोर्शीत नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ!...

शुद्धीकरणाशिवाय पाण्याची कॅन विक्री? चामोर्शीत नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ!…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

परवाने, फिल्ट्रेशन आणि पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्न; प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी

गडचिरोली/चामोर्शी,२९ जुलै २०२६::- चामोर्शी शहरात घरपोच २० लिटर पिण्याच्या पाण्याचे कॅन पुरवणाऱ्या काही व्यावसायिकांकडून आवश्यक शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणी विक्री होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. पिण्याच्या पाण्याचा व्यवसाय थेट सार्वजनिक आरोग्याशी निगडित असल्याने या प्रकारामुळे शहरात चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी वापरले जाणारे पाण्याचे कॅन स्वच्छ धुतले जात नसल्याचे दिसून येते. तसेच पाणी आरओ, यूव्ही किंवा इतर अत्यावश्यक शुद्धीकरण प्रक्रियेतून जात आहे की नाही, याबाबत ग्राहकांना कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. काही ठिकाणी क्लोरीनेशन, नियमित निर्जंतुकीकरण किंवा प्रयोगशाळेत पाण्याच्या गुणवत्तेची तपासणीही केली जात नसल्याचा आरोप आहे.

सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असल्याने दूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, टायफॉईड, कॉलरा यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका अधिक वाढतो. अशा परिस्थितीत शुद्ध पाण्याच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे पाणी विकले जात असेल, तर तो नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे शहरातील सर्व पाणी कॅन पुरवठादारांची विशेष तपासणी करण्याची मागणी केली आहे. संबंधित व्यावसायिकांकडे आवश्यक परवाने आहेत का, पाण्याचा स्रोत कोणता आहे, शुद्धीकरण यंत्रणा प्रत्यक्ष कार्यरत आहे का, तसेच पाण्याचे नमुने नियमितपणे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासले जातात का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दोषी आढळणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करून निकृष्ट दर्जाच्या पाण्याची विक्री तात्काळ बंद करण्यात यावी आणि नागरिकांना सुरक्षित, शुद्ध व दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

चौकशीची मागणी वाढली :-

पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत असताना अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त तपासणी मोहीम राबवून वस्तुस्थिती नागरिकांसमोर आणावी, अशी मागणीही शहरवासीयांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular