VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
नोकरीसाठी, परीक्षेसाठी व उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध,
गडचिरोली ,३० जुलै २०२६::- अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गडचिरोली तालुक्यातील मौजा कुंभी येथील तिघा नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवून सुरक्षित बाहेर काढत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या.
कुंभी येथील श्री. समीर विजय गेडाम (वय 25) यांची राजस्थान येथे बँक मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली असून, रुजू होण्यासाठी त्यांना तातडीने प्रवास करणे आवश्यक होते. तसेच कु. तुलसी नवबोध गेडाम (वय 21) यांची नागपूर येथे परीक्षा असल्याने त्यांनाही गावाबाहेर काढणे गरजेचे होते. याशिवाय श्री. दिलीप पितांबर गेडाम (वय 50) यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी बाहेर काढण्याची आवश्यकता होती.

या संदर्भात गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक श्री. विनोद चव्हाण यांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ एसडीआरएफ पथक आणि जिल्हा पोलिसांचे बचाव पथक बोट व आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले.
एसडीआरएफचे पोलिस निरीक्षक श्री. जी. जे. खोब्रागडे तसेच जिल्हा पोलिस बचाव पथकातील श्री. प्रेमानंद टेकाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी समन्वयाने बचाव मोहीम राबवून तिन्ही नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर संबंधितांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुढील प्रवास व वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
