VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
पालकमंत्र्यांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधावा – महेंद्र ब्राह्मणवाडे,
गडचिरोली,०१ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने दि. ९ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत “चरखे के पास चर्चा” या लोकसंवाद मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधावा, असे आवाहन काँग्रेसचे नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

ब्राह्मणवाडे म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही विमानतळ, एमआयडीसी आणि इतर विकास प्रकल्पांसाठी सुपीक शेतीचे संपादन सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याशिवाय विविध शासकीय विभागांतील रिक्त पदांमुळे नागरिकांची कामे रखडत असून, बेरोजगारीमुळे युवकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एसटी महामंडळाच्या बससेवेची दयनीय अवस्था, रस्त्यांची दुर्दशा, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि मूलभूत सेवांचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे पीक व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, दुर्गम भागात आजही रुग्णांना खाटेवरून किंवा पायी रुग्णालयात नेण्याची वेळ येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या सर्व प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
“चरखे के पास चर्चा” या लोकसंवाद मोहिमेद्वारे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेऊन ते शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. तसेच पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गेल्या सात ते आठ महिन्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याला भेट दिलेली नसल्याचा उल्लेख करत, या मोहिमेत सहभागी होऊन नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकाव्यात व त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, नगरसेवक सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
